बाणेर : बाणेर येथील दत्तनगर विधाते वस्ती येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून पावसाळ्यातील पुराच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. वारंवार पुराचे पाणी घरात शिरत असल्याने येथील रहिवासी हैराण झाले होते. नागरिकांचे ही परिस्थिती पाहून या समस्येची पुनम विधाते यांनी दखल घेऊन, वस्तीतील लोकांसमवेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कोथरूड चे आमदार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांच्याकडे संरक्षण भिंतीची मागणी केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीला त्वरित प्रतिसाद दिला आणि पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. या उपाययोजनेमुळे दत्तनगर विधाते वस्तीतील नागरिकांना पावसाळ्यातील पुराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुनम विधाते यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. संरक्षण भिंतीला निधी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांच्या घरात येणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. बाणेर येथील दत्तनगर परिसरात संरक्षण भिंत बांधण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. वसाहतीच्या उत्तर व दक्षिण बाजूस राम नदी व ओढ्यामुळे निर्माण होणारी पूरस्थिती रोखण्यास मदत होणार आहे.