अदानी समूहाचे शरद पवार यांनी केलेले समर्थन निश्चितच पूर्ण अभ्यास करूनच केले असावे – मुख्यमंत्री शिंदे

पुणे : अदानीनी घोटाळा केल्याचे सांगत आंदोलन करणाऱ्या पक्षांनी शरद पवार यांच्या वक्तव्यातून बोध घ्यावा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अदानी उद्योग समूहाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी उद्योगसमूहाची पाठराखण केली होती. कल्याण येथे एमसीएचआई- क्रेडाईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी एक्स्पो 2023 च्या उद्घाटनासाठी आले असता माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मत व्यक्त केले.

अदानी उद्योग समूहाबाबत हिंडेंनबर्ग संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानंतर या समूहात 20 हजार कोटी कुणाचे आहेत, असा प्रश्न विचारत काँग्रेस पक्षाने ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने देखील याबाबत वारंवार केंद्र सरकारला जाब विचारला होता. मात्र असं असताना शरद पवार यांनीच अदानी उद्योग समूहाची पाठराखण केल्याने जे लोक या मुद्यावर आंदोलन करत होते त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे आता याबाबत नक्की काय ते त्यांनीच उत्तर द्यावे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

आदरणीय शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून त्यांनी आजवर केंद्रात आणि राज्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहेत त्यामुळे शरद पवार यांनी अदानी समूहाचे समर्थन केल्याने ते निश्चितच पूर्ण अभ्यास करूनच केले असावे त्यामुळे या मुद्द्यावर रान उठवणाऱ्या पक्षांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

See also  वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी जीवन गाडे यांची नियुक्ती