माजी मंत्री, आमदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘धागा’ स्वदेशी मेळ्याचे शुक्रवारी उद्घाटन

पुणे: रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित ‘धागा’ या स्वदेशी मेळ्याचे दि. ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत गोल्डन लीफ लॉन्स, म्हात्रे पुलाजवळ, डीपी रस्ता, कर्वेनगर, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता माजी मंत्री, आमदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसंगी ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे’ उपाध्यक्ष, श्री चारुदत्त देशपांडे, ‘ब्रिहन्स नॅचरल प्रॉडक्ट’च्या संचालक शीतल आगाशे, ‘एमएसएमई’चे सहसंचालक मिलिंद बारापात्रे, उपसंचालक अभय दफ्तरदार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांच्या पुढाकारातून दरवर्षी हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यवसायवृद्धीसाठी व्यासपीठ देण्याचा उद्देश यामागे आहे. यावेळी काही यशस्वी उद्योजकांना सन्मानित करण्यात येईल. तसेच व्यवसायवृध्दीसाठी ‘एमएसएमई’च्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. हँडलूम साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती, ज्वेलरी, बॅग्स, कॉस्मेटिक्स, खाद्यपदार्थ असे वैविध्यपूर्ण स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत, असे संयोजकांनी कळवले आहे.

See also  पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्र्वादीचा मेळावा; अजित पवार म्हणाले,…" कुणाचे कुणावाचून नडत नाही"