पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांचा सविस्तर प्रगती अहवाल जिजाऊ बंगला, पुणे येथे प्रकाशित करण्यात आला.
यावेळी प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा, समस्या आणि भविष्यातील गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेला ‘जनहितनामा’ देखील प्रसारित करण्यात आला. प्रभागातील नागरिकांचे जीवनमान अधिक सक्षम, सुरक्षित आणि दर्जेदार व्हावे या उद्देशाने सर्वसमावेशक दृष्टिकोनातून हा जनहितनामा तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर उपस्थित होते.
प्रकाशित करण्यात आलेल्या प्रगती अहवालामध्ये प्रभाग ९ अंतर्गत बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी परिसरात राबविण्यात आलेली विकासकामे, विविध लोकहिताचे उपक्रम तसेच आगामी काळातील विकासाचा ठोस आराखडा मांडण्यात आला आहे.
विकासासाठी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संकल्प यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित करण्यात आला. नागरिकांच्या सहभागातून आणि विश्वासातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
























