बालेवाडीत “जन आशीर्वाद मेळाव्यात”  हजारोंच्या गर्दीसमोर सर्वसामान्यातील पाहुणे; चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर बालवडकर यांची नाराजी

बालेवाडी : हजारोंच्या गर्दीसमोर सर्वसामान्य घरकाम करणाऱ्या महिला, वडापाव ची गाडी चालवणारे, बांधकामावरील मजूर यांना व्हीआयपी प्रमुख पाहुणे करत अमोल बालवडकर  फाउंडेशनच्या वतीने आयोजित जन आशीर्वाद मेळाव्यात 35000 हून अधिक नागरिकांना सरंजाम वाटप करण्यात आले.

बालेवाडी येथे माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने भव्य “जन आशीर्वाद मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गेले दोन महिने अमोल बालवडकर यांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्यामुळे अमोल बालवडकर यांनी सर्व सामान्य जनतेतील नागरिकांना व्हीआयपी खुर्च्यांवर बसवून प्रमुख पाहुण्यांचा दर्जा देत मेळावा घेतला.

यावेळी 40 हजाराहून अधिक नागरिक, महिला कोथरूड मतदार संघाच्या विविध भागातून उपस्थित होते. आगामी विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मधून अमोल बालवडकर यांनी कोथरूड मतदार संघातून उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मागितल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गेले दोन महिने अमोल बालवडकर यांच्या कार्यक्रमाला जाणे टाळले आहे. विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या दबावामुळे अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला जात नसल्याची टीका दोन दिवसापूर्वी अमोल बालवडकर यांनी पत्रकार परिषद घेत केली होती.

बालेवाडी येथे जन आशीर्वाद मेळाव्यातून अमोल बालवडकर यांनी नागरिकांच्या माध्यमातून कोथरूड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. मेळाव्यामध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव न घेता पाच वर्षांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांची कामे केली नाही. आपल्या सुपर पॉवर चा वापर त्यांना मतदारांच्या सुविधांसाठी करता आला असता तो केला नाही अशी टीका अमोल बालवडकर यांनी मेळाव्यामध्ये केली.

कोथरूड मतदार संघातील भाजपा अंतर्गत असलेला कलह व भाजपा पदाधिकाऱ्यांवर असलेला दबाव या दोन्ही बाबी प्रामुख्याने या मेळाव्याच्या माध्यमातून जनतेसमोर आले आहेत. काही दिवसातच विधानसभेचे निवडणुकीचे बिगुल वाजणार असून कोथरूड मतदार संघातील निवडणुकीची चुरस ही उमेदवारी तिकिटांच्या माध्यमातून देखील पहायला मिळत आहे.

अमोल बालवडकर यांनी घेतलेला जन आशीर्वाद मेळावा यामुळे भाजपाचे कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढे पक्षातूनच तगडे आवाहन उभे राहिले असल्याचे सध्यातरी पहायला मिळत आहे.

See also  कोथरूड मतदार संघात काँग्रेसचा घरेलू कामगार मेळावा