ते पोलिस स्टेशन आहे, तुमच्या घरचा डायनिंग टेबल नाही !
खासदार सुप्रिया सुळेंचा लोहगांवमध्ये स्थानिक आमदारांवर जोरदार प्रहार,

लोहगाव : कल्याणीनगर पोर्शे प्रकरणी तरूण-तरूणी दोघांचा जीव गेला. त्यांच्या आई वडीलांच्या दु:खाचा कधी विचार केला गेला नाही. त्यांना काय वाटत असेल…त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल.. आणी तुम्ही कुणाची बाजू घेता ? त्यांच्याकडे पोर्शे आहे म्हणून, तो पैसेवाला आहे म्हणून “ये नही चलेगा”.  तुम्ही अश्रु पुसण्यासाठी जिथे जायला हवे होते तिथे न जाता आरोपीला बिर्याणी आणी पिझ्झा घेऊन पोलिस स्टेशनला जाता…ते पोलिस स्टेशन आहे, तुमच्या घरचा डायनिंग टेबल नाही ! ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची होती असा जोरदार प्रहार खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक आमदारांचे नांव न घेता केला.
त्या लोहगाव येथील सुनिल मास्तर खांदवे यांनी उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जगदगुरू संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात आयोजित नारीशक्ती सन्मान सोहळ्याला संबोधीत करीत होत्या. मंचावर पंकज महाराज गावडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, निता गलांडे, स्वाती पोकळे, राजेंद्र खांदवे, तानाजी शिंदे, वडगावशेरी अध्यक्ष आशीष माने, शैलेश राजगुरू, सागर खांदवे, इत्यादींची उपस्थिती होती. सुरूवातीला लोहगाव बसस्थानक चौकात सुप्रिया सुळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तुतारी व महिला मुलींच्या भजनी मंडळींसोबत वाजतगाजत स्वागत झाले.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या मी स्वत: त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पछाडीन, पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशा प्रवृत्तीला घरी पाठवण्याची जबाबदारी तुमच्यामाझ्यासहीत वडगावशेरीकरांची आहे. रक्त तपासणीत रक्त बदलण्याचे पाप ज्यांनी केले. ससून हॉस्पिटल मध्ये फोन कोणी केला ? पैशाच्या मस्तीमुळे आरोपीच्या बाजूने तुम्ही उभे राहता. गुन्हेगार आहेत ही सर्व लोकं. प्रकरण दाबायचा प्रयत्न केला गेला, याचा जाब एक आई विचारतेय, महाराष्ट्र विचारतोय. गृह मंत्रालयाला यांचे उत्तर द्यावे लागेल.

सत्तेतले भ्रष्टाचारी ट्रीपल इंजीन खोके सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. गुन्हेगारी वाढत चालली, महिलांवरील होणारे अत्याचार वाढत चालले आहे. बदलापुर प्रकरण, पुणे बोपदेव घाटात महिलेवर सामूहिक अत्याचार अशा वर्षातील ३६५ दिवसात २८० बलात्काराच्या घटना घडल्या. हे असले सरकार तर हद्दपारच केले पाहिजे असे परखड मत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
महापालिकेचे स्विकृत नगरसेवक सुनिल मास्तर खांदवे यांनी लोहगांव २००९ पासून कायम विकासपासून वंचीत असून इथे रिंगरोड, रस्ते जोड, रस्त्यांचे रूंदीकरण, डीपी रस्ते, अंतर्गत रस्ते, पथदिवे, इत्यादी कामे प्रलंबित आहेत. खेळासाठी उद्यान, दवाखाना, आयटी पार्क इत्यादी कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. जवळच ४५० एकरची प्राईड वर्ल्ड सिटी आहे. ती पुर्ण विकसित झाल्यानंतर ५० हजार फ्लॅटमधील रहिवाशी एकाचवेळी रस्त्यावर उतरल्यास त्याचा ताण आजही लोहगाववर येत आहे व भविष्यातही येणार आहे. त्यासाठी पुरेशा सोईसुविधा लोहगावमध्ये गरजेच्या आहे. लोहगावचा विकास आराखडा बनवतांना भविष्याचा विचार करून होणे गरजेचे आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी एसआरए प्रकल्प राबविणे इत्यादींसाठी कायम आम्ही जनतेसोबत राहणार असून मला पक्षाकडून संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पंकज महाराज गावडे, प्रशांत जगताप, राजेंद्र खांदवे यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी लोहगावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयाला त्यांनी भेट दिली.

लाडकी बहिण लाडकी लोकसभा निवडणूकीनंतर झाली..
सुप्रिया सुळेंचा अजीत पवारांनाही टोला
लाडकी बहिण योजनेचे दीड हजार रूपये खात्यात जमा केले अन् खाद्यतेल तीन हजारांनी महाग केले. नवरात्र, दसरा पुढे दिवाळी आहे माय माऊल्यांनो आता चकल्या तळू नका. मुलांना चकलीचा फोटो दाखवून दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. लाडकी बहिण लाडकी लोकसभा निवडणूकीचा निकाल पाहून झाली असलेयाचा टोला अजीत पवार यांना लगावला. हे खोके सरकार आमदारांना दोन हजार कोटी देऊन सत्तेत आले आहे. महाविकस आघाडीचे सरकार पाडुन सत्तेत आले आहे. ईमानदारी ही माझी ताकद आहे. २०२९ ला मी व अमोलदादां सोबत पुणेयातून रविंद्र धंगेकर खासदार म्हणून आमच्यासोबत दिल्लीला येतील. असे काम तुम्हा आम्हाला करायचे असल्याचेही त्यांनी वक्तव्य केले.

See also  नागरिकांना विकासाची हमी देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा घरोघरी-केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे