मराठा समाजाची बैठकीत सरकार व स्थानिक आमदार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नाराजीचे सूर

पाषाण : कोथरूड मतदार संघामध्ये मराठा समाजाने मागील वेळी प्रचार करून देखील मराठा समाजाच्या मागण्यांकडे आमदार म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांनी दुर्लक्ष केले. पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांना न भेटणारे एकमेव आमदार चंद्रकांत पाटील आहेत. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच स्थानिक मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुढे आले पाहिजे अन्यथा मराठा समाज पाटील यांना विरोध करेल  अशी भावना मराठा बांधवांनी बैठकीमध्ये व्यक्त केली.

कोथरूड मतदार संघातील औंध बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी कोथरूड परिसरातील मराठा बांधवांची बैठक पाषाण बाणेर लिंक रोड येथे पार पडली. यावेळी हाके यांचा हेतू उधळून लावणाऱ्या मराठा बांधवांचा सन्मान बैठकीमध्ये करण्यात आला.

सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. 50% च्या आत ओबीसी आरक्षण मागणी असताना जाणून-बुजून मागणी नसलेले आरक्षण देत आहे. कोथरूड मतदार संघातील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देत आगामी काळात जरांगे पाटील जी राजकीय भूमिका मांडतील त्याचे समर्थन करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

दसरा मेळाव्यासाठी नारायण गड येथे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी करण्यात आलेले नियोजन यावेळी सांगण्यात आले. तसेच जास्तीत जास्त मराठा बांधवांनी नारायण गड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

कोथरूड मतदार संघामध्ये मराठा समाजाने मागण्यांसाठी बंद पाळला तसेच अनेकदा आंदोलने केली. स्थानिक पातळीवर नोंदी सापडून देखील कुणबी दाखले मिळण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत आहेत.  आमदार चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाची भेट घेतली नाही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीला पाषाण, सुतारवाडी सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सुस म्हाळुंगे, औंध, शिवाजीनगर, कोथरूड आदी परिसरातील मराठा प्रतिनिधी उपस्थित होते.

See also  बाणेर बालेवाडी पाषाण प्रभाग९ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती