‘व्यसन टाळा, स्वच्छतेचे नियम पाळा’ -पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांचा संदेश

पुणे : शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात पद्मश्री रमण गंगाखेडकर यांनी ‘आरोग्य आणि स्वछता’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आरोग्य चांगले रहावे म्हणून व्यसनापासून दूर रहावे आणि स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळावे, असा संदेश शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी दिला.

श्री. गंगाखेडकर यांनी मानवी जीवनातील स्वच्छतेचे महत्व सांगताना दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेच्या सवयी कशा विकसित करता येतील ते उदाहरणांसह सांगितले. ते म्हणाले, काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुणे, दररोज सकाळी उठल्यावर व संध्याकाळी झोपण्यापूर्वी दात घासणे, कोणत्याही उघड्या पृष्ठभागावर स्पर्श करणे टाळणे या सवयी आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. हात न धुता त्याच हाताने खाल्यास डायरियासारखे आजार होतात.

अस्वच्छतेमुळे विविध त्वचा विकार होतात. स्वच्छतेसोबत व्यायामही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम असून दररोज चालण्याची सवय ठेवावी. किशोरवयातील काही चुकीच्या सवयीमुळे त्याचा प्रौढ जीवनावर परिणाम होतो. व्यसनाची लागलेली सवय मोडणे कठीण जाते. याबाबत मित्रांना वेळीच नाही म्हणायला शिकले पाहिजे, असे डॉ.गंगाखेडकर म्हणाले.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मकता महत्वाची असल्याचे सांगून ते म्हणाले, मुलांची स्वतःची स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे. प्रत्यकाने स्वतःमधील क्षमता ओळखुन त्या वाढविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःची कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे जीवनात लहान लहान गोष्टीमधील स्वच्छता, समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे, देशाची आरोग्य विषयक धोरणे निश्चित करण्यासाठी योगदान देणे, स्वतःशी व देशाशी प्रामाणिक राहून देशाची सेवा करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्लास्टिकचा अतिवापर मानवाच्या शरीरावर खूप परिणाम करत आहे. प्लास्टिकचा अंश आता मानवी रक्तामध्ये सापडत आहे ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.गंगाखेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान केले.

यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे, विज्ञान विभागांच्या विभाग प्रमुख तेजस्विनी आळवेकर, अधिव्याख्याता वृषाली गायकवाड उपस्थित होते.

See also  वायरलेस कॉलनी कडून ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेविका सौ. अर्चना मुसळे यांचा जाहीर सत्कार