भाजपची उमेदवार यादी, राज्यभर नाराजी

विशेष विश्लेषण
पुणे : भारतीय जनता पक्षाची पहिली उमेदवार यादी प्रसिद्ध झाल्यावर राज्यात सर्वत्र नाराजीचे, बंडखोरीचे पडसाद उमटू लागले आहेत.

पुणे शहराचा विचार केला तर कोथरूड आणि पर्वती मतदारसंघात उमेदवारीवरून नाराजीचे पडसाद उमटले आहेत. कोथरूडमधील इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर, पर्वतीमधील माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले नाराज असून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कोथरुडचे उमेदवार चंदकांत पाटील यांनी देवदर्शन केले, बैठका घेतल्या पण त्यात बालवडकर यांचे समर्थक नव्हते. पर्वती मध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही. पहिल्या यादीत शहरातील तीन आमदारांची नावे आली पण, आपले नांव नाही हे पाहताच खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी पक्षनेत्यांच्या भेटीसाठी मुंबई गाठली आहे. कसबा मतदार संघातही कार्यकर्ते निराश झाले आहेत.

उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर दाद मागण्यासाठी भाजप नेते, समर्थक यांची गर्दी झाली होती. या नाराजांची समजूत एकट्या फडणवीस यांना घालावी लागणार आहे. भाजपची दुसरी यादी प्रसिद्ध झाल्यावरही नाराजीचे सूर असेच उमटतील. मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची यादी आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या पक्षाची यादी आल्यावरही भाजपमध्ये अजूनच नाराजी रहाणार आहे. शिंदे आणि पवार यांना जे मतदारसंघ दिले जातील ते भाजप कार्यकर्त्यांना मान्य होतील असा? हा ही प्रश्न आहेच. भाजप आणि अजित पवार गट यांच्यात अजूनही सुसंवाद साधला गेलेला नाही.

भाजपने पहिल्या यादीत ७१ आमदारांना पुन्हा तिकीट दिले आहे. प्रत्येक आमदाराचा परफॉर्मन्स पाहून, जनमताचा कौल घेऊन मगच उमेदवारी दिली जाईल, असे भाजपने लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केले. परंतु जाहीर झालेली यादी पाहिल्यावर सर्व्हे वगैरे सगळा देखावा होता, असे भाजपचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. मित्र पक्ष आणि ‘आयात’ केलेल्यांना महत्त्व दिले जात असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील सद्य स्थिती पाहता धाडसी प्रयोग करण्याचे नेत्यांनी टाळले असावे. अशा प्रयोगातून गुंतागुंत होण्यापेक्षा आहे त्या स्थितीतच निवडणुकीला सामोरे जाऊया, असे नेतृत्वाने ठरवले असावे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

See also  रयत शिक्षण संस्थेच्या चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा