पुणे : येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदार जागृती अभियान (SVEEP) जोरदारपणे सुरू आहे. या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये मतदानाचे महत्त्व रुजवण्यासाठी “संकल्पपत्र” व मतदार प्रतिज्ञा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगण्यासाठी संवाद साधला गेला.
कार्यक्रमात खडकवासला स्वीप पथकाचे प्रमुख श्री. शरदचंद्र गव्हाळे यांनी मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले, तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची प्रतिज्ञा घेतली. नागरिकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या ओळखीतील जेष्ठ व दिव्यांग नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
अभियान अंतर्गत निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार श्री. किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली, शालेय विद्यार्थी, जेष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी विविध जनजागृती उपक्रम महिनाभरापासून आयोजित करण्यात आले आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुढील काळातही अशा अनेक कार्यक्रमांची योजना आहे.मतदान जागृती अभियान यशस्वी राबविण्यासाठी श्री गव्हाळे यांच्या सोबत प्रा.मच्छिंद्र दिवटे, अमोल पिसाळ, ज्ञानेश्वर शिंदे, अभिमन्यू करे आदी प्रयत्न करीत आहेत.स्वीप समितीतर्फे विविध शाळांमध्ये ७५ पेक्षा अधिक शिक्षक बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकींमध्ये मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रियेविषयी जागृती, तसेच विद्यार्थ्यांमार्फत अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षकांमार्फत हा संदेश कुटुंब, मित्रमंडळ, तसेच परिसरात पोहचवून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.