पिंपरी : राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विकासात्मक मुद्दे घेऊन विधानसभा निवडणुकीला महायुती एकजुटीने सामोरे जात आहे. जनता महायुतीच्या मागे आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी मेट्रो, पाणी, रस्ते असे अनेक प्रश्न महायुतीने मिटवले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र असून एकदिलाने निवडणुका लढून जिंकणार असल्याचा निर्धार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महायुती व इतर घटक पक्ष यांच्या वतीने रविवारी चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरी विधानसभेचे उमेदवार, आमदार अण्णा बनसोडे आणि भोसरी विधानसभेचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांचे प्रतिनिधी कार्तिक लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार अश्विनीताई जगताप, उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदींसह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
योगेश बहल यांनी सांगितले की, पिंपरी विधानसभेतून आमदार अण्णा बनसोडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. या ठिकाणी इच्छुक असणाऱ्या इतर व्यक्तींची नाराजी दूर करून अण्णा बनसोडे यांच्यासह महायुतीतील चिंचवड विधानसभेचे उमेदवार शंकर जगताप, भोसरी उमेदवार आमदार महेशदादा लांडगे या तीनही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.
चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार राज्यातून आणि शहरातील तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप सह सर्व घटक पक्ष एकत्रित काम करीत आहेत. त्याला त्या सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची गंगा आणि वेग आणखी वाढवण्याचे व्हिजन आहे. पिंपरी चिंचवड शहराचे नाव देशातच नव्हे तर जगात उंचावण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, यासाठी जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
सदाशिव खाडे यांनी सांगितले की, चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे सोमवारी तर भोसरी विधानसभेचे आमदार व उमेदवार महेशदादा लांडगे मंगळवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती खाडे यांनी यावेळी दिली.