पिंपरी : चिंचवड शहरातील विधानसभेच्या तीनही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीपूर्वी दावा करत मागितल्या होत्या आणि त्या धोरणात्मक रित्या शरद पवार यांनी शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वात मिळवल्या यामुळे शहरातील ही लढत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार अशी थेट मानली जात आहे. यातील पिंपरी ची एक जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला असली तरी शहरातील मुख्य लढत ही भाजपाशीच मानली जात आहे. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाने तीनही जागा घेत पिंपरी चिंचवड शहरांमध्ये थेट भाजपाला आवाहन दिले आहे. हे महत्त्वाचे पुण्यातील शहर स्वतःकडे ठेवण्यासाठी पवारांच्या गटाकडून प्रयत्न केले जात आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वातावरण तयार होण्याआधीच अजित गव्हाणे यांनी अनेक माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे विरुद्ध अजित गव्हाणे ही लढत सध्या निवडणुकीच्या रिंगणात लक्षवेधी ठरत आहे. हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा म्हणून महेश लांडगे प्रामुख्याने निवडणुकीच्या रिंगणात दिसत असून त्यांच्या विरोधात निवडणूक पूर्व धोरणात्मक बांधणी करून उतरलेले अजित गव्हाणे ही लढत होत आहे.
तर पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने निष्ठावंतांना न्याय असे आवाहन करत मागितलेले तिकीट सुलक्षणा शीलवंत यांना देण्यात आले.यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशी होणार आहे. या लढतीवरूनच प्रामुख्याने पिंपरीतील राष्ट्रवादी पक्ष कोणाच्या बाजूने हे देखील पिंपरी चिंचवड करांना पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघांमध्ये अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे.
तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ऐनवेळी उमेदवारीसाठी असलेली चुरशीची स्पर्धा ही लक्षवेधी होती. या स्पर्धेमध्ये अखेर घरातील संघर्षावर मात करत भाजपाच्या शंकर जगताप यांना त्यांचा दावा असल्याप्रमाणे उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर खासदार अमोल कोल्हे व खासदार सुप्रिया सुळे यांची तगडी शिफारस असलेले व शहराध्यक्ष तुषार कामठे यांचे जुने मैत्रीपूर्ण संबंध असलेले राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये दोनदा कलाटे यांनी निवडणूक लढवून प्रभावी मतदान खेचले आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्याने यंदा कलाटे हे विजयी वाटचाल करतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तीनही मतदार संघ धोरणात्मक रित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदरात पाडून घेण्यात शहराध्यक्ष तुषार कामठे यशस्वी ठरले असले तरी पिंपरी चिंचवड शहरावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा लावण्यात त्यांची मुत्स्सद्येगिरी कामाला येणार का हे पाहायला मिळणार आहे.