कात्रज,पुणे : आजच्या डिजिटलीकरणाच्या युगात वाचनसंस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने पुण्यातील ग्रंथपाल किरण काळे यांनी एक अभिनव संकल्पना राबवली आहे. त्यांनी ‘ग्रंथदान मोहीम’ सुरू केली असून, अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने मंडळाला भेट देणाऱ्या पाहुण्यांना पारंपरिक शाल, श्रीफळ आणि बुकेऐवजी ग्रंथ भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.तसेच मंडळाच्या सदस्यांच्या वाढदिवशी केक न कापता आणि पार्टी न करता, यादिवशी ज्या सदस्यांचा वाढदिवस आहे त्यांना किरण काळे यांच्या तर्फे ग्रंथ भेट दिली जाते.
ही संकल्पना वाचनसंस्कृतीला चालना देण्यासोबतच ज्ञानदानाची नवी परंपरा रुजवण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे पुस्तकप्रेमींसाठी एक सकारात्मक वातावरण तयार होत असून, ग्रंथसंस्कृती अधिक बळकट होण्यास मदत मिळत आहे. पुण्यातील विविध साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत.
या उपक्रमाला आणखी विस्तार देण्यासाठी मातृगंध संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निलाक्षी काळे-सालके, आयटी कंपनीत कार्यरत आहे,यांच्या संकल्पनेतून ‘ग्रंथ भिशी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे जमा झालेली पुस्तके ग्रामीण भागातील शाळांना भेट दिली जातात. अनेक ठिकाणी शाळांमध्ये पुरेशा पुस्तकांची कमतरता असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावणे आणि ज्ञानसंपदा वाढवणे हे ‘ग्रंथ भिशी’च्या माध्यमातून साध्य केले जात आहे.
या संकल्पनेबाबत बोलताना किरण काळे म्हणाले, “ग्रंथ हे केवळ ज्ञानाचे भांडार नसून संस्कृतीचे आणि समाजप्रबोधनाचे साधन आहेत. याच विचारातून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. शाल, श्रीफळ यांपेक्षा ग्रंथ भेट देणे अधिक मौल्यवान आहे.”
‘ग्रंथ भिशी’च्या उपक्रमात अनेक समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यात सहभागी होत आहेत. पुणे आणि परिसरातील वाचनप्रेमींनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या मोहिमेमुळे केवळ वाचनसंस्कृती वृद्धिंगत होत नाही तर गरजू शाळांना आवश्यक ग्रंथसंपदा उपलब्ध होत आहे. समाजात वाचनाची गोडी निर्माण करून पुस्तके हा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ग्रंथदान मोहीम’ आणि ‘ग्रंथ भिशी’ महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.