पुण्यातील आरपीआयच्या एक गट महायुतीच्या उमेदवारांना मतदान करणार नाही डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्या समोर एकत्र येत घेतली शपथ

पुणे : पुण्यामध्ये आरपीआय च्या एका गटाने महायुतीला मतदान करणार नाही अशी एकत्र येत शपथ घेतली. माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी कार्यकर्त्यांना ही शपथ दिली.यामुळे महायुतीच्या उमेदवारांकडे अडचणी वाढणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने आरपीआय (आठवले) पक्षाला शहरातील एक जागा तरी सोडावी, अशी मागणी आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली होती. आत्तापर्यंत भाजपचा मित्र पक्ष म्हणून प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यासोबत राहिलेल्या आरपीआयला भाजपने सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. त्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नाराजी आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमचे मत निळा झेंडा आणि बाबासाहेबांच्या विचारांना आहे. सन्मानपूर्वक वागणूक न देणाऱ्या महायुतीला मतदान करणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ” महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयला राज्यात एकही जागा दिली नाही. याची खदखद सर्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांच्या अनुयायांमध्ये आहे. राज्यातील आंबेडकरी विचारांच्या अनुयायांमध्ये देखील याबाबत तीव्र भावना आहेत. शहरातील अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात आहे. त्याचे पडसाद निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळतील”, असे धेंडे यांनी म्हंटले आहे.

See also  बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही कार्यकर्त्याला दिलेली धमकी खपवून घेतले जाणार नाही -खा.सुप्रिया सुळे