खडकवासला : खडकवासला विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल मुरलीधर मते यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांची खडकवासला काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी राहुल मते यांची अध्यक्षपदावरुन सोमवारी (४नोव्हेंबर ) हा निर्णय घेण्यात आला. धायरी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मिलिंद पोकळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन याची माहिती देण्यात आली.
पुणे जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, उपाध्यक्ष अवधूत मते व हवेली तालुका अध्यक्ष सचिन बराटे यांनी याबाबत जाहीर पत्रक काढून राहुल मते यांचा निषेध केला आहे.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले,
काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी मिलिंद पोकळे यांनी पक्ष श्रेष्ठींचा आदेश मानुन खडकवासला मतदारसंघात दाखल केलेली उमेदवारी आज मागे घेतली मात्र पक्षाचे खडकवासला अध्यक्ष राहुल मते यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश धुडकावून लावत उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. महाविकास आघाडीत खडकवासला मतदारसंघ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणा नुसार बंडखोरी केलेल्या राहुल मते यांना पदावरून बडतर्फ करुन पक्षातुन हाकलपट्टी करण्यात आली आहे.यावेळी बारामती लोकसभा काँग्रेसचे अध्यक्ष लहुअण्णा निवंगुणे, श्रीकृष्ण बराटे, सुरेश मते,आदी उपस्थित होते .
पुणे शहरातील काँग्रेसच्या तीन पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कोणतीही कारवाई केली नाही.मी एक सामान्य कार्यकर्ता असल्याने माझ्यावर हेतूतः केलेली कारवाई अन्यायकारक आहे.
-राहुल मुरलीधर मते, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार