पुणे : बाणेर येथे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून औषधोपचारांसह रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहे. बाणेर मधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र क्रमांक 11 सुरू करण्यात आले आहे. परंतु स्मार्ट सिटी एरिया बाणेर बालेवाडी मध्ये खाजगी हॉस्पिटल प्रमाणे सुविधा देणारे एकही पालिकेचे हॉस्पिटल महानगरपालिकेला उभारता आले नाही. यामुळे नागरिकांना मोफत उपचारांसाठी राजकीय नेत्यांच्या आरोग्य शिबिरांवर अवलंबून राहावे लागत आहे.
भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वास्थ मिशन अंतर्गत “आयुष्यमान भारत” मार्फत आरोग्य तपासणी सुविधा बाणेर परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मोफत आरोग्य सुविधांचा लाभ बाणेर येथील दवाखान्यामध्ये घेता येणार आहे. तसेच या ठिकाणी रुग्णांना मोफत औषधोपचार देखील दिली जातात यामुळे नागरिकांचा आरोग्यावरील मोठ्या प्रमाणात खर्च कमी करण्यास मदत मिळाली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर परिसरात असलेल्या कोविड वन हॉस्पिटलचे रूपांतर संसर्गजन्य आजारांसाठी नायडू हॉस्पिटल मध्ये करण्यात आले आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक तपासण्या अल्पदरात करण्यात येत असून या ठिकाणी संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांना ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील करण्यात आले आहे. बाणेर परिसरातील खाजगी हॉस्पिटल्स प्रमाणे नायडू हॉस्पिटलमध्ये देखील हृदय रोगाची शस्त्रक्रिया, डिलिव्हरी, अन्य शस्त्रक्रिया सुरू करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.
पालिकेच्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यात याव्यात. जेणेकरून पाषाण बाणेर बालेवाडी औंध परिसरातील नागरिकांना अल्पदरामध्ये चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. स्मार्ट सिटी एरिया मध्ये पालिकेला एकही खासगी हॉस्पिटल प्रमाणे सुविधा देणारे एकही सक्षम हॉस्पिटल उभारता आले नाही. स्मार्ट सिटी एरियामध्ये पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अल्प दरात सुविधा देणारे कमला नेहरू हॉस्पिटल अथवा ससून, जिल्हा रुग्णालय यांच्या धरतीवर हॉस्पिटल उभारण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या मागणीकडे महानगरपालिका प्राधान्याने लक्ष देणार की नागरिकांना राजकीय कार्यकर्त्यांच्या मोफत आरोग्य शिबिरांवरच अवलंबून राहावे लागणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.