परदेशी शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जमाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाकरिता सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आयुक्तालय स्तरावर परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. एमबीए, वैद्यकीय अभ्यासक्रम, बी. टेक, विज्ञान, कृषी व इतर विषयांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कौटुंबिक कमाल उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे.

परदेशी शिष्यवृत्तीचे विहित नमुन्यातील अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे (दूरध्वनी क्र. 02133-244266) या कार्यालयात संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असेही प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी कळविले आहे.

See also  नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची कार्यतत्परता कोथरुड मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात