पुणे : बजेट २०२५ मध्ये तरुणांच्या भविष्यासाठी कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत. रोजगार निर्मितीबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे तरुणांच्या आशा सरकारने उद्ध्वस्त केल्या आहेत. या विरोधात युवक काँग्रेसतर्फे आज पुण्यातील गुडलक चौक, डेक्कन येथे प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष शिवराज मोरे, मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, पुणे शहर अध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष उमेश पवार, कौस्तुभ नवले, प्रथमेश अबनावे, आनंद दुबे, भाविका राका, गणेश उबाळे, मेक्षाम धर्मावत, ऋषिकेश वीरकर, मतीन शेख, अजिनाथ केदार, विशाल कामेकर, सचिन सुडगे, सद्दाम शेख, अथर्व सोनार, हर्षद हांडे, तुषार नांदगुडे. उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तरुणांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यात आला. युवक काँग्रेसने सरकारला इशारा दिला की जर तातडीने रोजगारासंदर्भात ठोस निर्णय घेतले नाहीत, तर राज्यभर तीव्र आक्रमक आंदोलन छेडले जाईल.
प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले,*
“बजेटमध्ये तरुणांसाठी कोणतेही ठोस धोरण नाही, रोजगाराच्या संधींविषयी कोणतेही स्पष्ट दिशानिर्देश नाहीत. सरकार केवळ खोटी स्वप्नं दाखवून तरुणांची फसवणूक करत आहे. आम्ही सरकारला जाब विचारतो – आमच्या भविष्यासाठी तुम्ही काय करणार?”
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले,”देशाचा पाया असलेल्या तरुणांना रोजगार नाही, शिक्षण क्षेत्राला आधार नाही, आणि उद्योजकांसाठी प्रोत्साहन नाही! मग सरकारला विकास म्हणायचं तरी काय? हे सरकार केवळ कॉर्पोरेट्सचे हित पाहत आहे, सामान्य तरुणांची चिंता त्यांना नाही.”
शहराध्यक्ष सौरभ अमराळे म्हणाले,”पुण्यासारख्या शहरात लाखो तरुण शिक्षण घेतात, स्पर्धा परीक्षा देतात, पण सरकारी आणि खासगी क्षेत्रात संधी नाहीत. हा तरुण कुठे जाणार? जर सरकारने योग्य पावले उचलली नाहीत, तर युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारेल.”
युवक काँग्रेसने सरकारकडे तातडीने रोजगार निर्मितीवर ठोस कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, महाराष्ट्रभर सरकारच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
अमेरिकेहून भारतीयांचे ज्या पद्धतीने निर्वासन केले, युवक काँग्रेसचा तीव्र निषेध!
अमेरिकेहून भारतीयांचे जबरदस्ती निर्वासन (Deportation) झाल्याच्या घटनेचा युवक काँग्रेस तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधानांचा ५६” छातीचा दावा कुठे गेला? भारताच्या नागरिकांवर अन्याय होतो, आणि केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसते! कोलंबियासारख्या देशाने स्वतःचं विमान पाठवून आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणलं, मग भारताने असं का केलं नाही? युवक काँग्रेसने मागणी केली आहे की, भारत सरकारने तत्काळ या मुद्द्यावर ठाम भूमिका घ्यावी, भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत आणि अमेरिकेच्या प्रशासनाकडे कडक निषेध नोंदवावा.