पुणे जिल्ह्यातील घेरा सिंहगड गावाची पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार  – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 18 : पुणे जिल्ह्यातील घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीतील गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना लवकरच पूर्ण करण्यात येऊन नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य भीमराव तापकीर यांनी पाणीपुरवठा योजनेबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती.

या चर्चेला उत्तर देताना मंत्री श्री.पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घेरा सिंहगड गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाची छाननी करण्यात येऊन, जल जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनेच्या कामाची स्थळ पाहणी केली. या पाहणीअंती योजनेचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. या योजनेबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्याकडे 11 सप्टेंबर 2024 रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीत योजनेच्या पूर्णत्वास निधी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या  योजनेच्या पूर्णत्वास निधी अभावी कुठलीही अडचण येणार नाही.

या योजनेचे काम ज्या कंत्राटदाराने केले आहे ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार निकृष्ट कामाची चौकशी करण्यात येईल. काम निकृष्ट असल्यास त्याच कंत्राटदाराकडून हे काम पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

See also  गड किल्ल्याच्या आर्किटेक्चरल दस्तऐवजीकरण स्पर्धेत  सहभाग घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे