पुणे : औंध येथील डीपी रस्त्यावरील शाश्वत हॉस्पिटल समोर पुणे महानगरपालिकेच्या पादचारी मार्गांवर अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या स्टॉलमुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नागरिकांना व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
अनेकदा या स्टॉलवर कारवाई केल्याचे चित्र निर्माण केले जाते परंतु ठोस कारवाई होत नसल्याने पुन्हा हे स्टॉल त्याच जागेवर येतात. सोसायटीच्या व बंगल्यांच्या तसेच हॉस्पिटलच्या गेट समोर स्टॉल लागत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल होते. भाजीचे स्टॉल फळांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी रस्त्यांवर चार चाकी गाड्या थांबतात यामुळे हॉस्पिटलमध्ये आलेल्या ॲम्बुलन्स व पेशंटच्या नातेवाईकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
अनेकदा स्टॉल धारकांकडून दादागिरी केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई अगोदरच माहिती देत असल्याने कारवाईच्या वेळी सर्व स्टॉल गायब होतात. तर काही स्टॉल धारक आमचे अधिकाऱ्यांना हप्ते आहेत तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशा पद्धतीने अरेऱ्यावेची भाषा वापरतात. यामुळे हॉस्पिटल परिसरातील अनाधिकृत स्टॉल धारकांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
अतिक्रमण विभागाच्या वतीने होत असलेली तोंड देखिल कारवाई ही अनधिकृत स्टॉलला पाठिंबा दर्शवणारी असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी फोन केल्यानंतर अनधिकृत स्टॉलवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत नागरिकांनी भाजपा आमदार चंद्रकांत दादा पाटील व अतिक्रमण अधिकारी व सहाय्यक आयुक्त औंध यांना कारवाई साठी अर्ज दिले आहेत. तरी देखील कारवाई होत नसल्याने नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.