बहुजनांचा संघर्ष आजही कायम : अशोक वानखेडे

औंध : बहुजनांना चांगले जीवन जगता यावे यासाठी महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले मात्र बहुजनांचा संघर्ष आजही कायम आहे. महापुरूषांचे विचार आपण आत्मसाद करू शकलो नाही त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले. आखिल औंधरोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती २०२५ च्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त  औंधरोड येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.


यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने, आखिल औंधरोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती २०२५  चे अध्यक्ष सुशांत कांबळे, माजी अध्यक्ष रुपेश भालेराव, मनोज सूर्यवंशी, मंडळाचे सचिव रोनित यादव, अक्षय ठाकूर, रोहित अडसूळ, त्रिशला गायकवाड, शालिनी वाघचौरे, देविश्री आहेरे, विठ्ठल कांबळे, ज्ञानोबा खरात, गोरखनाथ निकाळजे, बाबासाहेब आंबोलीकर, अभिजीत शेलार, वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद खरात, प्रवीण डोळस आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्तविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख सुनील माने यांनी करून दिली. आपल्या प्रास्तविकपर भाषणात ते म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र निधी दिला जातो, मात्र केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात जवळपास ५ लाख ५४ हजार कोटींचा मागासवर्गीयांचा निधी गोठवला आहे. याचप्रमाणे राज्य सरकारनेही मागासवर्गीयांच्या हक्काचे ४० हजार कोटी रुपये दिले नसल्याबद्दल मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. नुकताच अजित पवारांनी जाहीर केलेल्या  अर्थसंकल्पामध्ये ‘लाडक्या  बहीणींच्या’ निधीसाठी मागासवर्गीयांच्या हक्काचा मागास आणि आदिवासी समाजाचा ७ हजार कोटींचा निधी वळता केला आहे. भाजप व त्यांचे पाठीराखे लोक डॉ. बाबासाहेब आंबडेकर व अन्य महापुरुषांचा एटीएम प्रमाणे वापर करतात. मात्र याबाबत आपण चर्चा करत नाही आणि आंधळेपणाने या घात करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे जातो. त्यात आपल्यातीलही काही जण आहेत. ही खरी शोकांतिका आहे.
यावेळी बोलताना वानखेडे म्हणाले, आज महात्मा फुलेंच्या जयंती निमित्त त्यांच्या जन्मभूमीत येऊन कुंभ मेळ्यात जाऊन स्नान करण्यापेक्षा जास्त चांगले वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन परिस्थितीत नवीन समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अन्याय,अत्याचार आणि गरिबीत असलेल्या समाजाला त्यांनी प्रगतीची एक नवीन वाट दाखवून दिली. मात्र आज आपण त्या वाटेवर चालतो का याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण महापुरुषांची जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम करतो मात्र त्यांचे विचार समाजात पोहचवत नाही. महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण केला असता तर राज्यात आणि केंद्रात असे कपाळ करंटे सरकार आले नसते. राज्यात आणि केंद्रात भाजप प्रणीत सरकार आहे. या भाजपाचा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला आहे. या संघाला बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना मान्य नाही. संघाला सर्वात प्रिय मनुस्मृति आहे आणि मनुस्मृति बाबासाहेबांनी जाळली होती. जेव्हा संविधान देशात लागू झालं तेव्हा संघाने त्याला विरोध केला होता. या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा भाजप आणि संघाचे लोक राज्यघटना बदलण्यासाठी स्पष्ट बहुमत देण्याचे आवाहन करत होते.

See also  वाचन सुलभता वाढविण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटायझेशन करावे : राज्यपाल रमेश बैस


कुंभमेळ्यात २०३५ साली धर्मसंविधान लागू करण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत,बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना कचरा आहे ती फेकून दिली पाहिजे, असे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणतात मात्र भाजप त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. महात्मा फुलेंच्या जीवनावरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाने मंजुरी देऊनही वेळेत प्रदर्शित होत नाही, आपण याचा साधा निषेधही करू शकत नाही इतके आपण लाचार झाले आहोत असे ते म्हणाले.
शिवाजी महराजांचे वंशज स्वत:ला म्हणून घेणारे खासदार उदयनराजे यांनी स्त्री शिक्षणासाठी सर्वात अगोदर भोसलेंनी पुढाकार घेतल्याचे वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर देताना त्यांनी महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून जीर्णोद्धार केला त्यावेळी साताऱ्याची गादी काय करत होती ? त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष शाळांचे खासगीकरण करत आहे याचा जाब तुम्ही तुमच्या पक्षाला विचारणार आहात का ? असा प्रश्न उपस्थित केला.  केंद्र सरकार आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे मात्र दलित आणि मागासांवर प्रचंड अन्याय, अत्याचार होत आहेत. यावर कोठेही चर्चा केली जात नाही. या सरकारच्या काळात होत असलेल्या अन्याय पहिले तर या पेक्षा इंग्रजांचे सरकार चांगले होते असे म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच सर्वांनी एकत्रित येऊन महापुरुषांचे विचार समाजात रुजवले पाहिजेत आणि ही जुलमी राजवट झुगारून दिली पाहिजे असे ही वानखेडे यावेळी म्हणाले.