सर्व धर्मीय बांधवांसाठी मशिदीचे दार खुले ; बोपोडी मशिदीत घेतला अनोखा उपक्रम

पुणे – ईद-उल-फित्रच्या पवित्र दिवशी मुस्लिम समाजाच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. जमात-उल-मुस्लिमीन ट्रस्ट, बोपडी यांच्या वतीने सर्व धर्मीय बांधवांना मशिदीची सखोल माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मशिदीबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर करण्याच्या हेतूने या उपक्रमाची संकल्पना आखण्यात आली होती.

ईदच्या दिवशी दरवर्षी विविध राजकीय नेते, पोलिस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम समाजाला शुभेच्छा देण्यासाठी मशिदीत येतात. मात्र, यंदा या पाहुण्यांना मशिदीमध्ये आत जाऊन नमाजाची संपूर्ण प्रक्रिया अनुभवण्याची संधी देण्यात आली. त्यांचे खजूर, शिरखुर्मा आणि इतर पारंपरिक पदार्थांनी स्वागत करण्यात आले.

यावेळी श्रीकांत पाटील,आनंद छाजेड, अनिल भिसे, मयूरेश गायकवाड, संकेत कांबळे,  राजेंद्र भुतडा, विनोद रणपिसे, ॲड. नंदलाल धिवार, विशाल जाधव, अनिल पवार, ॲड. विठ्ठल अरुडे, जय चव्हाण, सुंदर ओहळ, ज्योती परदेशी, शंभरकर, अजीत थेरे आदी उपस्थित होते.

पाहुण्यांना मशिदीतील प्रत्येक विभागाची सखोल माहिती देण्यात आली. मौलाना मुफ्ती वाजिद यांनी सर्वांना मशिदीतील पवित्रता आणि धार्मिक प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. त्यांना मशिदीतील विविध भाग दाखवण्यात आले – वजूखाना (अभिषेक स्थळ) : येथे नमाजपूर्वी स्वच्छता कशी केली जाते, याबाबत माहिती दिली.
नमाजगृह : येथे नमाज अदा करण्याची प्रक्रिया आणि त्यामागील अर्थ समजावून सांगण्यात आला. खुतबा स्थळ : जिथे मौलवी धार्मिक शिकवणूक देतात आणि समाजाला मार्गदर्शन करतात. महिला प्रार्थना विभाग : मशिदीतील महिलांसाठी असलेल्या प्रार्थना व्यवस्थेबाबत गैरमुस्लिम महिलांना माहिती देण्यात आली.

काही समाजविघातक घटक मशिदींविषयी चुकीच्या अफवा पसरवतात – मशिदींमध्ये शस्त्रसाठा केला जातो, राष्ट्रविरोधी कारवाया होतात, इत्यादी. मात्र, प्रत्यक्ष मशिदीला भेट दिल्यानंतर गैरमुस्लिम बांधवांचे हे गैरसमज दूर झाले. त्यांनी स्वतः मशिदीतील शांतता आणि भक्तीमय वातावरण अनुभवले. त्यांना मशिदीतील प्रत्येक कोपरा दाखवण्यात आला, जिथे वजू केले जाते, नमाज अदा केली जाते आणि धार्मिक शिकवण दिली जाते.

कार्यक्रमाचे आयोजन जमात-उल-मुस्लिमीन ट्रस्ट, बोपडी यांच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमात बाबासाहेब सौदागर, मुनाफ हारून शेख, डॉ. निसार, सलीम बेपारी, फारूक पीरजादे आणि इतर मुस्लिम नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. नंदलाल धिवार यांनी सर्व पाहुण्यांच्या वतीने आभार मानले आणि असे उपक्रम समाजातील एकोपा वाढवण्यासाठी गरजेचे असल्याचे नमूद केले.हा उपक्रम मुस्लिम समाजाच्या परंपरा आणि धार्मिक विधी याबद्दल समज निर्माण करण्यासाठी घेतलेला अनोखा पुढाकार होता. धर्मीय सौहार्द आणि समता याला बळकटी देण्यासाठी भविष्यातही असे कार्यक्रम घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

See also  समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे- मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे