पुणे : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय सिंह यांनी आज स्पष्टपणे सांगितले की हा चित्रपट कोणत्याही काटछाटीशिवाय प्रदर्शित झाला पाहिजे.
पुणे शहरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संजय सिंह बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही दबावाला बळी न पडता, संयम आणि ठामपणे पक्षाची भूमिका मांडण्याचे आवाहन केले.तसेच “फुले दांपत्याचे कार्य आणि विचार हे आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला विरोध होणे म्हणजे दलित, वंचित आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान आहे.असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ब्राह्मण समाजाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप काही संघटनांनी केला असून, या विरोधामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला अडथळे निर्माण झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय सिंह म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सप्ताह देशभर साजरा होत असताना, ‘फुले’ चित्रपटाला विरोध केला जाणे हे खेदजनक असून हा दलित आणि वंचित समाजाच्या भावना दुखावणारा प्रकार आहे.”
यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर देखील टीका केली. ‘वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५’ संदर्भात बोलताना त्यांनी आरोप केला की, “हे विधेयक धार्मिक संस्थांच्या जमिनी बळकावण्यासाठी आणले जात असून, याचा थेट फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भांडवलदार मित्र घेणार आहेत. हे विधेयक घटनाविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली.
या कार्यक्रमास आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अजित फाटके, उपाध्यक्ष विजय कुंभार, पक्षाचे सचिव अभिजीत मोरे, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, तसेच धनंजय बेनकर,पुणे शहर प्रवक्ते किरण कद्रे, पुणे शहर महासचिव अक्षय शिंदे सतीश यादव पुणे शहर युवक अध्यक्ष अमित म्हस्के, सुनिता काळे, माधुरी गायकवाड प्रीती निकाळजे संजय कोने, फॅबियन सॅमसन, शिवाजी डोलारे सुभाष कारंडे निखिल खंदारे नौशाद अन्सारी किरण कांबळे उमेश बागडे अरशद बेग इकबाल तांबोळी गणेश थरकुडे कुमार धोंगडे तहसीन देसाई संजय कटारनवरे सुमित काळे अजिंक्य जगदाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.