पुणे : पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन (वय 60) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
रजनी त्रिभुवन यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेवर महापौर, बराच काळ नगरसेवक तसेच विविध समित्यांवर काम केले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांना (2004- 2006 ) काम करण्याची संधी मिळाली होती. महापौर पदाच्या काळात त्यांनी पुणे शहराचे विविध समस्या मार्गी लावल्या. त्यासोबतच अनेक समाज उपयोगी निर्णय देखील त्यांनी त्यांच्या महापौर पदाच्या कालावधीत घेतले. काँग्रेस पक्षातील पुणे शहराच्या ज्येष्ठ नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. पक्षाच्या सर्व उपक्रमात यांचा शेवटपर्यंत सक्रिय सहभाग होता. नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेलेले असताना त्यांना त्याच ठिकाणी हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत मनमिळावू, हसतमुख अशा रजनीताई यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव अंत दर्शनासाठी त्यांच्या ताडीवाला रोड येथील निवासस्थानी ठेवण्यात आलेले असून सायंकाळी साडेचार वाजता त्यांच्या पार्थिवावर कैलास स्मशानभूमी (नायडू हॉस्पिटल जवळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.