खडकवासला : कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर नुकत्याच झालेल्या केंद्रीयलोकसेवा आयोगाच्या ( यु पी एस सी)परीक्षेत जिल्ह्यातील दुर्गम वेल्हे (राजगड) तालुक्यातील 22 वर्षीय शिवांश सुभाष जागडे यांनी पहिल्याच प्रयत्नात देशात 26 वी रँक आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळवत आयएएस अधिकारी झाला आहे. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील शिवांशच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वेल्हे तालुक्यातील पानशेत रोडवरील रुळे हे शिवांशचे मुळ गाव. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब असलेले शिवांशचे वडील सुभाष जागडे शेती करत करत व्यवसाय करतात. त्या निमित्ताने ते सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे सध्या त्यांचे वास्तव्यास आहे. शिवांश ची मोठी बहीण वकील आहे.
शिवांशचे शालेय शिक्षण धायरी येथील डीएसके स्कूल मध्ये तर अकरावी बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथील सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट मध्ये झाले. बारावीनंतर शिवांशने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा दिली होती परंतु त्यात त्याची निवड झाली नव्हती. त्यामुळे त्याने जिद्दीच्या जोरावर विज्ञान शाखेततून पदवी मिळवत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यूपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला.
त्याच्या यशाबद्दल बोलताना शिवांशने ॓पुण्यनगरी॔ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना स्वयंअध्ययनावर जास्त भर दिला. तर परीक्षेसाठी काही ट्युटोरियल्सचा वापर केल्याचे शिवांश ने सांगितले. स्वयंअध्ययन करताना काढलेल्या नोट्स खूप उपयोगी पडल्या. दिवसभरात ठराविक वेळेत केलेला अभ्यास या यशासाठी उपयुक्त ठरला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मुलांनी मनात परीक्षेबद्दल अवघड असल्याचा कोणताही न्यूनगंड किंवा भीती न बाळगता अभ्यास केल्यास या परीक्षेत सहज यशस्वी होता येऊ शकते. तसेच जिद्द आणि कठोर परिश्रमाला कोणताही पर्याय नाही. परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे. समाजात काय चालले आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे, याचे धोरणात्मक नियोजन केले पाहिजे.
– शिवांश सुभाष जागडे