उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई :-  राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने “डॅशबोर्ड” विकसित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.


याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव संतोष खोरगडे, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर (ऑनलाइन) उपस्थित होते.


मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले, या डॅशबोर्डमध्ये विद्यापीठांशी संबंधित प्रवेश प्रक्रिया, निकाल, शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शुल्क आणि महाविद्यालयांशी संबंधित संलग्नता व शैक्षणिक सुविधा तसेच सार्वजनिक ग्रंथालय यांची माहिती समाविष्ट आहे. या डॅशबोर्डवर २६ सार्वजनिक विद्यापीठे व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा समावेश असून भविष्यात राज्यातील सर्व खाजगी व सार्वजनिक विद्यापीठांचा समावेश डॅशबोर्डमध्ये करण्यात येणार आहे. सदर डॅशबोर्ड उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठीही उपलब्ध आहे.


या डॅशबोर्डमधील माहितीचे विश्लेषण करून शैक्षणिक विषयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या शैक्षणिक बाबींकरिता खात्रीशीर अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजित आहे.असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माहिती दिली.

See also  शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश अर्जासाठी ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ