‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. चित्ररथाची पाहणी करून मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय नलवडे, केंद्रीय संचार ब्यूरोचे उपसंचालक निखिल देशमुख आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातीत सर्व तालुक्यातील १ हजार ८४३ गावात आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात ‘आपला संकल्प विकसित भारत’च्या १२ एलईडी चित्र रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात आंबेगाव आणि बारामती या तालुक्यातून करण्यात येत आहे. ही मोहीम २ महिने सूरू राहणार असून २६ जानेवारी २०२४ रोजी या मोहिमेचा समारोप होईल.

दररोज प्रत्येक तालुक्यातील २ गावी सकाळी आणि संध्याकाळी हे चित्ररथ जाणार आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती होण्यास मदत होणार आहे.

See also  नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे