पुणे : सेवाभावी संस्था समाजात सामाजिक कार्य करताना माणसे जोडण्याचे कार्य करतात. या सेवाभावी संस्थामुळे माणुसकी जिवंत आहे असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री उल्हास पवार यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना व्यक्त केले.
भवानी पेठेत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, ट्रस्ट, पुणे यांच्यातर्फे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ बाल उद्यानात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अक्कलकोट स्वामी यांच्या मंदिराच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन श्री उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सांस्कृतिक महोत्सवाचे यंदा 30 वे वर्ष आहे. या सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमास कोल्हापूरचे प्रसिद्ध महाराज सचिन, आमदार हेमंत रासने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, माजी नगरसेवक आबा बागुल, माजी नगरसेवक संजय बालगुडे, अविनाश साळवे, डॉ सत्यशिल नाईक, डॉ सतीश देसाई, सुनिल रुकारी, अनिल गाडवे, माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीणसिंग परदेशीं, रविंद्र माळवदकर,विपीन गुपचूप आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे, डॉ शैलेश पुणतांबेकर, रोशनी फाउंडेशनचे संस्थापक प्रविण निकम, व रक्ताचे नाते या संस्थेचे राम बांगड यांचा खास सत्कार श्री कोल्हापूरचे महाराज श्री सचिन महाराज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आला. अक्कलकोट स्वामीची कृपासिंधू मूर्ती, पुणेरी पगडी, शाल, व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमात उपस्थित नागरिक व भाविकांचे स्वागत या महोत्सवाच्या संयोजक सौ. प्रियंका किराड — सागर यांनी केले. ट्रस्टचे अध्यक्ष व स्वागतोत्सुक श्री वीरेंद्र किराड यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त नितीन शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्राजक्ता जोगळेकर — श्रावणे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात बोलताना श्री उल्हास पवार म्हणाले की, सामाजिक संस्था माणसाचे विकास आणि प्रगती डोळ्यासमोर ठेऊन कार्य करतात. मानवधर्म हाच आपला खरा धर्म हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ते सामाजिक कार्य करतात. म्हणूनच समाजात माणुसकी जिवंत आहे.
आमदार हेमंत रासने आपल्या भाषणात म्हणाले की, पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याने देशाला एक चांगली वेगळी दिशा देऊन देशासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.
प्रशांत वाघमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रशासन व राजकारणी नेत्यांनी शहराच्या विकासाला चालना देताना योग्य पाऊले उचलली पाहिजेत. तरच चांगली शहरे निर्माण होतील.
श्री वीरेंद्र किराड यांनी प्रास्ताविकपर आपल्या भाषणात सांगितले की, पुणे शहराच्या पूर्व भागात सांस्कृतिक महोत्सवाद्वारे एका वेगळ्या उपक्रमाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तरुण पिढीवर चांगले संस्कार होतील. आदर्श युवक युवती निर्माण होऊन एक आदर्श भारतीय नागरिक निर्माण होतील. म्हणून आपण ट्रस्टतर्फे गेली 30 वर्षे सांस्कृतिक महोत्सव व अन्य उपक्रम पुण्याच्या पूर्व भागात राबवित आहे.
या उदघाटनाच्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती प्रविण निकम, राम बांगड व डॉ शैलेश पुणतांबेकर यांचीही सत्काराला उत्तरे देणारी भाषणे झाली.