भूमी अभिलेख मुळशी (पौड) कार्यालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने  नागरिक त्रस्त

पौड : मुळशी (पौड) येथील भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवार दिनांक २९एप्रिल रोजी साडे अकरा वाजले तरी शिपाई सोडून एकही कर्मचारी जागेवर हजर नव्हते. मुळशी तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका आहे तालुक्यातून दुरवरून आपापल्या कामानिमित्त वेळ आणि पैसा खर्च करून या कार्यालयात शेतकरी व नागरीक येत असतात. अनेकदा असे प्रकार घडत असल्याने भूमी अभिलेख कार्यालयामधील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मोजणी करणे,चतुसिमा, नकाशे, स्कीम, फाळणीबारा, मिळकत पत्रिका,आकारबंद आदी कागदपत्रे घेण्यासाठी अर्ज दाखल करुन नकला मिळण्याची तारीख मिळाली तरी त्या – त्या तारखेला नकला मिळत नाहीत. पुन्हा तितकाच वेळ आणि पैसा खर्च करून दुसऱ्या दिवशी यावे लागते. यासाठी कोणाकडे दाद मागावी याबाबत नागरीक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या कार्यालयात कधीही या आणि कधीही जा,विचारणारे कोणीही नाही अशा दिमाखात कर्मचाऱ्यांचे येणे जाणे आहे. या कार्यालयाच्या उपअधीक्षक स्वप्ना पाटील या सुद्धा यावेळी कार्यालयात उपस्थित नव्हत्या. त्यांच्याशी  भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी बंद होता.

See also  यंदाचा बंदोबस्त निर्विघ्न सुखकर; गणेशोत्सवासाठी २०० स्वच्छतागृह, तीन व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था- पालकमंत्र्यांचा पुढाकार