पुणे डिफेन्स स्टार्ट अप आणि मॅन्युफॅक्चरिंग हब जाहीर करावे -आ.सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

मुंबई : शहर आणि परिसरातील लष्कराची केंद्र आणि वास्तव्यास असणारे लष्करी अधिकारी आणि तज्ज्ञ पाहता पुणे शहर डिफेन्स स्टार्ट अप आणि मॅन्युफॅक्चरिंग हब जाहीर करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत बोलताना केली.

शहर आणि परिसरात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, ॲम्युनिशन फॅक्टरी, डिआरडिओ, डिआयएटी अशा लष्कराच्या महत्वाच्या वास्तू आहेत. लष्करात आणि लष्कराशी संबंधित संस्थांमध्ये काम केलेले अनेक कर्मचारी, अधिकारी पुण्यात वास्तव्याला आहेत. लष्कराशी संबंधित इतका तज्ज्ञ वर्ग पुण्यात उपलब्ध आहे. तसेच भारत फोर्ज आणि एमएसएमई कंपन्या संरक्षण खात्याला कॉम्पोनन्ट्स, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर पुरवित आहेत, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी भाषणात दिली.

याकरीता पुण्याला डिफेन्स स्टार्ट अप आणि मॅन्युफॅक्चरिंग हब जाहीर करावे. यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला नक्की चालना मिळेल आणि येथील तज्ज्ञ आणि संशोधकांच्या योगदानामुळे आपला देश संरक्षण क्षेत्रात आणखी आत्मनिर्भर होईल, असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

आपल्या देशाला आत्मनिर्भर आणि अव्वल तंत्रज्ञानाच्या दिशेने पंतप्रधान मोदी यांनी नेले, याबद्दल मी पंतप्रधानांचे अभिनंदन करतो. तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाचे रक्षण करायला आपला देश सक्षम आहे, हे आपण ‘ऑपरेशन सिंदूर’मधून दाखवून दिले, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बोलताना सांगितले.

See also  भाजपाची कोथरूड उत्तर विधानसभा मंडलाची कार्यकारणी जाहीर, बालेवाडीला महत्त्वाच्या पदानसह झुकते माप