सुस : पुणे महानगरपालिका मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सुस, महाळुंगे, बावधन गावांमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी बावधन वाहतूक विभागाच्या वतीने पुणे महानगरपालिकेकडे 35 वॉर्डाची मागणी करण्यात आली आहे. गेले वर्षभर वार्डांची मागणी सातत्याने केली जात असताना पुणे महानगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बावधन वाहतूक विभाग हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत येत आहे. परंतु या वाहतूक विभागाचे काम हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असल्याने वाहतूक विभागाकडून पुणे महानगरपालिकेकडे वार्डन पुरवण्याची सातत्याने मागणी केली जात आहे.
सुसखिंड ते सनी वर्ल्ड पर्यंत मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेला भाग हा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेला आहे. या सुसगाव येथील मुख्य रस्त्यावरून हिंजवडी परिसरातून येणाऱ्या वाहतुकीसाठी अनेक नागरिक पर्यायी रस्ता म्हणून वापर करतात. यामुळे अंतर्गत वाहतुकी मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मुख्य रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असून सुसगाव, तापकीर चौक, सुसगाव कमान, पेट्रोल पंप या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक पोलिसांना सहाय्यक म्हणून ट्राफिक वॉर्डनची मागणी सातत्याने केली जात आहे.
सुसगाव बावधन परिसरामध्ये हॉस्पिटल, शाळा तसेच अनेक व्हीआयपी दौरे असतात. यावेळी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पोलिसांची तारेवरची कसरत पहायला मिळते. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देखील मागील वर्षी पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाला देखील पुणे महानगरपालिकेकडे वार्डांची मागणी करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असताना तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये सातत्याने वाहतूक कोंडीबाबत विधानसभा सदस्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने वार्डन द्यावेत अशी मागणी केली जात आहे.