पुणे मेट्रोच्या प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आढावा
प्रकल्पांना गती देण्याचे दिले निर्देश



पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन सुरू असलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत असे निर्देश दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, विनोद अग्रवाल, महामेट्रो कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे, प्रमोद आचार्य आदी उपस्थित होते.

यावेळी सद्यस्थितीत मेट्रो सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड मनपा स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ ते गरवारे स्थानकांदरम्यानच्या रोजच्या प्रवाशी वाहतुकीबाबत तसेच लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट, गरवारे कॉलेज ते सिव्हील कोर्ट आणि सिव्हील कोर्ट ते रुबी हॉल क्लिनीक स्थानकांमुळे प्रवासी संख्येत वाढीचा अंदाज याबाबत श्री.पाटील यांनी माहिती जाणून घेतली. मेट्रोच्या या लवकरच सुरू होणाऱ्या सुमारे १२ कि.मी. च्या लांबीमुळे नागरिकांचा प्रवासाचा वाचणारा वेळ आणि खर्च आदी फायदे लोकांना पटवून देण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रचार- प्रसिद्धी करावी, असे निर्देश त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठविलेल्या पीसीएमसी ते निगडी या ४.४१ कि.मी.च्या आणि स्वारगेट ते कात्रज या ५.५ कि.मी.च्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित तसेच अन्य अधिकाऱ्यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत सादरीकरण करुन माहिती दिली.

See also  मोहोळजी, प्रसिद्धी नको विमान प्रवाशांना सुविधा द्या-माजी आमदार मोहन जोशी