कर्वेनगर : संत परंपरेतील थोर संत, समाजसमरसतेचा संदेश देणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा कर्वेनगर येथे विदर्भ नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
या सोहळ्याच्या प्रारंभाला संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वारकरी भजनी मंडळाच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले. उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्तपणे आरती केली. पूजनानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सर्व भक्तजनांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी कर्वेनगर येथील मारुती भैरवनाथ मंदिराच्या सभागृहाचे आकर्षक सजावट करण्यात आली होती. या दिवशी संत परंपरेच्या स्मरणाने परिसर भारावून गेला होता.
यावेळी शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष किरण बारटक्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला अध्यक्ष बाबा धुमाळ, तसेच माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
दरम्यान, पंढरपूर ते घुमान अशी संत नामदेव महाराजांची पालखी सायकल वारीद्वारे नेणाऱ्या पत्रकारांपैकी राजेंद्र कापसे यांचा संत नामदेव महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून मेहनत घेतली. त्यामध्ये अध्यक्ष रवींद्र बोबडे, सचिव यशवंत फुसे, खजिनदार सुभाष बुधे, तसेच प्रदीप बोबडे, सुभाष कापसे, प्रकाश चिंचुलकर, राजू कावळे, गुणवंत बुधे, अरुण वंदेकर यांनी मुख्य भूमिका बजावली.महिला वर्गातूनही उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला. ज्योती देशकर, सरोज बोबडे, रत्ना फुसे, रंजना बुधे या कार्यकर्त्यांनी नियोजन व व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हे, तर समाज एकतेचा आणि संत परंपरेचा जागर करणारा ठरला.