पुणे : महापालिका शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी इमारत दुरुस्ती, स्वच्छता आदी उपाययोजना हाती घेऊन सुधारणा करण्यात येतील, तसेच शाळांचा दर्जा वाढवला जाईल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) प्रसारमाध्यमांना दिली.
छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या शाळा सुधारणांच्या संदर्भात आज उपायुक्त, शिक्षणाधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासमवेत शिक्षण मंडळ येथे सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
छत्रपती शिवाजीनगर मतदार संघामध्ये पुणे महानगरपालिकेच्या २८ शाळा आहेत. काही शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्या संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा झाली. शाळेचा परिसर, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना यावेळी देण्यात आल्या, शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितली.
या बैठकीला शिक्षण उपायुक्त विजय थोरात, शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग आशा उबाळे हे अधिकारी आदी उपस्थित होते.