दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरानंद फाऊंडेशन चा मदतीचा हात

पुणे : सामाजिक कार्याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करत सुरानंद फाऊंडेशनने एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले. संस्थेच्या वतीने संस्थापक-अध्यक्ष श्री.विश्वास नंदकुमार कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजगड(वेल्हा) तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बालवड, खोपडेवाडी आणि कोंढाळकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तर व रेनकोट यांचे वाटप करण्यात आले.

या परिसरातील शाळांना अनेक मूलभूत सुविधांचा अभाव भासतो. या पार्श्वभूमीवर अशा विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणसामग्री पोहोचवून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आला.

या उपक्रमात हिंदू युवा प्रबोधिनीचे संस्थापक राजेंद्र बेंद्रे, शिवभक्त उद्योजक किरण शेळके, उद्योजक दादासाहेब दाभाडे, किरण आदक तसेच सौ.मनिषा कळमकर आदी उपस्थित होते.

सुरानंद फाऊंडेशन समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे काम सातत्याने करत असून,सांस्कृतिक, धार्मिक,शिक्षण,आरोग्य आणि सामाजिक प्रबोधन अशा क्षेत्रांत कार्यरत आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पालकांच्याही डोळ्यांत कृतज्ञतेचे भाव उमटले.

“सामाजिक बांधिलकी ही केवळ शब्दांत नसून कृतीतून सिद्ध व्हावी, हा आमचा विश्वास आहे,” असे विश्वास कळमकर यांनी यावेळी सांगितले.

See also  कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच आणि धोबी पछाड - आमदार छगन भुजबळ