बाणेर-बालेवाडीचा एवढा विकास कोणी केला ?– जयेश मुरकुटे यांचा सत्ताधाऱ्यांना उपरोधिक सवाल; सत्ताधारी मात्र मौनात

पुणे :  बाणेर-बालेवाडी परिसरात विकासाच्या नावावर सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर “बाणेर बालेवाडी चा एवढा विकास कोणी केला?”या आशयाचे बॅनर सध्या बाणेर परिसरात झळकत आहेत.

गेले पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मागील पाच वर्ष भाजपाचे नगरसेवक या परिसरामध्ये कार्यरत आहे तर कोथरूड विधानसभा मतदारसंघावर गेले तीन टर्म  भाजपाची सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्ह व भाजपाचे कमळ चिन्ह याचा बॅनर वर उल्लेख करत या विकासाचे श्रेय कोणाचे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

रस्त्यांवरील खड्डे, पावसाचे साचलेले पाणी, वाहतूक कोंडी, ड्रेनेजची नासधूस, तुटलेली चेंबर्स, धोकादायक विद्युत पोल आणि वाकलेली झाडे अशा अनेक समस्यांनी परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

“स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकासाच्या गप्पा सुरू आहेत, पण बाणेर-बालेवाडीतील जनतेला याचा लाभ काहीच मिळत नाही.
विकास केला म्हणणारे आज सत्तेत आहेत, मग नागरिकांना आजही हे हाल का सहन करावे लागत आहेत? याचा कोणी जाब विचारत का नाही?”असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी केला आहे.

या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन प्रश्न विचारले पाहिजेत आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे, असेही मुरकुटे यांनी म्हटले आहे.

See also  पाषाण येथील शिवनगर, विठ्ठल नगर, लमाण वस्ती येथील नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ