औंध : औंध रोड येथील शांता निकेतन सोसायटीत सहकार खाते, महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा हौसिंग फेडरेशन, आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पुणे शहर (२) च्या उपनिंबधक सौ. निलम पिंगळे यांनी उपस्थित सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सभासद यांना सहकारी संस्थांचे दैनंदिन व्यवस्थापन, पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका, लेखा परीक्षण, इमारतींचा पुनर्विकास इ. विषयांवर मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष श्री. सुहास पटवर्धन यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महासंघातर्फे आयोजित विविध मेळाव्यांद्वारे सहकार विषयक जनजागृती बद्दल माहिती दिली. सहकार कायद्यात होणारे प्रस्तावित बदल याविषयी देखील माहिती दिली.
महावितरणचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता डॉ. निलेश रोहनकर यांनी पंतप्रधान सूर्य घर योजनेची माहिती दिली. या योजनेची वैशिष्ट्ये, सोसायटी आणि त्या अनुषंगाने अंतिम उपभोक्त्यांना मिळणारे फायदे याचे विस्तृत विवेचन केले. त्यानंतर सारस्वत बँकेचे अधिकारी श्री. कोकाटे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रश्र्नोत्तरांच्या भागात उपस्थित सोसायटी सभासदांनी त्यांच्या शंका अधिकाऱ्यांना विचारल्या आणि त्यांना यथोचित मार्गदर्शन व उत्तरे मिळालीत. या मेळाव्यास शांता निकेतन सोसायटी व्यवस्थापनाने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
या मेळाव्याचे आयोजन पुणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या औंध शाखेच्या अध्यक्षा सौ. प्रिती शिरोडे आणि सचिव श्री. दिलीप तिवारी यांनी केले होते. या मेळाव्यास महासंघाचे उपाध्यक्ष श्री. कर्णिक, ज्येष्ठ संचालक श्री. असगेकर, श्री. विलास थोरात, श्री. उराडे, श्री. उंडरे, श्री. नरोना उपस्थित होते.