नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना गुलाबपुष्प देऊन वाहतूक जणजागृती – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) क्रीडा सेलचा लक्ष्मी रस्त्यावर उपक्रम

पुणे : शहराच्या मध्य वस्तीत वाहनचालकांडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, ‘नो एंट्री’चे फलक लावलेले असतानाही दुचाकी व चारचाकी चालक बिनधास्त गाड्या दामटत असतात. बेदरकारपणे ‘नो एंट्री’तून वाहने चालवणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) क्रीडा सेलच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील चित्रशाळा चौकात गुलाबपुष्प देऊन वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.

‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व क्रीडा सेलचे अध्यक्ष मदन कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्षा राहुल देखणे यांच्या नेतृत्वात हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहर पदाधिकारी सचिन यादव, दीपक पोकळे, उदय निगडे, गणेश ठोंबरे, शामराव घोरपडे, हृषिकेश देखणे, अश्वदीप भोसले यांनी यामध्ये सहभाग घेतला. दरम्यान, उद्या बुधवारपासून (दि. १०) नो एंट्रीमधून येणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

राहुल देखणे म्हणाले, “शहराच्या मध्यवस्तीत कसबा, सदाशिव, नारायण, शनिवार, बुधवार, शुक्रवार, नवी पेठ या भागांत दुचाकी, तसेच अनेक चारचाकी वाहनचालक कोणातही नियम पाळताना दिसत नाहीत. ‘नो एंट्री’चे फलक लावलेल्या भागातही बिनधास्त गाड्या घालतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप केला, तर त्यांना अरेरावीची भाषा वापरली जाते. पोलिसांकडूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यासंदर्भात विश्रामबाग व फरासखाना या दोन्ही पोलीस स्थानकांत निवेदन दिले आहे.”

“चित्रशाळा ते भानुविलास टॉकीज, प्रभात प्रेस ते विजय टॉकीज, हत्ती गणपती ते दुर्वांकुर यासह इतर अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक आहे. मात्र, अनेकजण उलट दिशेने वाहने चालवितात. पेठांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. नियम मोडणाऱ्यांत या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, लक्ष्मी रस्ता व कुमठेकर रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. परिणामी, वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण वाढत आहे. स्थानिकांना याचा त्रास होत असून, पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात,” असे देखणे यांनी नमूद केले.

See also  शास्त्रीय नृत्यकला आणि लोककलांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील