पुणे : – पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘कॉफी विथ सीईओ’ या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला.
या विशेष कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, योजना शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण तसेच ओपन लिंक्स फाउंडेशनचे संजय दालमिया व त्यांची टीम उपस्थित होती.
या उपक्रमाचा उद्देश उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रोत्साहन देणे, अध्यापनातील अडचणी जाणून घेणे तसेच त्यांच्या उपक्रमांची माहिती इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवून प्रेरणा देणे हा आहे. अनौपचारिक वातावरणात झालेल्या संवादात शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर, ऑनलाइन शिक्षण पद्धती, स्मार्ट क्लासरूम, ग्रामस्थ व लोकसहभागातून राबविण्यात येणारे उपक्रम, अध्यापनातील आव्हाने व आवश्यक भौतिक सुविधांबाबत अनुभव मांडले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शिक्षकांच्या सूचनांची नोंद घेऊन आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ते म्हणाले, “शिक्षक हे समाज घडवणारे खरे शिल्पकार आहेत. ‘कॉफी विथ सीईओ’ हा उपक्रम शिक्षकांशी थेट संवाद साधण्याचे व्यासपीठ ठरले आहे. तुमच्यासारख्या उपक्रमशील शिक्षकांमुळेच पुणे जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेचे तुमच्या कल्पना व प्रयत्नांना नेहमीच पाठबळ राहील.”
या यशस्वी संवादामुळे प्रशासन व शिक्षक यांच्यातील सहयोग अधिक दृढ होऊन शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नवा उत्साह निर्माण होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.























