म.न.पा. नोकरभरतीमध्ये माजी सैनिकांवरील अन्याय दूर करावा : माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची मागणी.

पुणे : म.न.पा. नोकरभरतीमध्ये माजी सैनिकांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली. यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त श्री खेमनार, विधी विभाग प्रमुख Adv निशा चव्हाण यांच्या बरोबर बैठक घेऊन विस्तृत चर्चा करण्यात आली.


महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिकेमध्ये वर्ग-३ आणि वर्ग-४ पदांवर नोकरभरती करताना माजी सैनिकांना राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिकेत २००३ साली या माजी सैनिकांची अस्थायी कामगार म्हणून भरती करण्यात आली.२००५ मध्ये या माजी सैनिकांनी नोकरीत कायम करावे या मागणीसाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. तिथे योग्यतो न्याय न मिळाल्याने संबंधित कामगारांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. २०१४ साली मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जेव्हा महानगरपालिका भरती प्रक्रिया करेल तेव्हा वयोमर्यादा शिथिल करून या माजी सैनिकांना इतर उमेदवारांसोबत समान संधी मिळावी असे आदेश पारित केले होते.
२०१४ ते २०२२ अश्या ८ वर्षांमध्ये महानगरपालिकेकडून कोणतीच भरती प्रक्रिया झाली नाही. महानगरपालिकेने २०२२ साली भरती प्रक्रिया सुरू केली असता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले.
या वेळी माजी सैनिक हे अर्ज भरूच शकले नाहीत कारण त्यात वयोमर्यादा शिथिलतेसाठी महानगरपालिकेकडून कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कामगारांना कामावरून काढू नये असे स्पष्ट आदेश असतानाही, या ३० माजी सैनिकांना कामावरून कमी करण्याच्या नोटिसा महापालिकेकडून बजावण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार माजी सैनिकांनी केलेली देशसेवा आणि त्याग लक्षात घेऊन त्यांना आदराची वागणूक द्यावी असा संकेत असताना महानगरपालिकेने या सैनिकांना स्वतः च्या सोयीने विविध विभागात वापरले आहे. मनपा उपायुक्त श्री माधव जगताप यांनी अतिक्रमण विरोधी कारवाई केली असता त्यांच्या वर झालेल्या हल्ल्यात या सैनिकांनी त्यांचे रक्षण केले होते. या माजी सैनिकांना वाऱ्यावर सोडणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा भंग आहे.
या प्रकरणी माजी आमदार आणि भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. मेधताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांनी मनपा आयुक्त श्री. विक्रम कुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी ऍड. कृष्ण जयंत सदावर्ते यांनी माजी सैनिकांच्या वतीने कायदेशीर कामकाज पाहिले.माजी सैनिकांच्या वतीने श्री. अशोक चव्हाण आणि श्री. चंद्रकांत भोसले यांनी पुढाकार घेऊन मनपाने यासंदर्भात योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी करत तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

See also  मनोज मांढरे यांना संत मुक्ताबाई संस्थानचा " भागवत धर्म प्रसारक " पुरस्कार जाहीर