बाणेर : माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे खंत व्यक्त करत पक्षांमध्ये काम करण्यासाठी नव्या पदाची नियुक्ती करून संधी देण्याची मागणी केली. विधानसभेच्या वेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत अमोल बालवडकर यांनी भारतीय जनता पार्टीचे कोथरूड मतदार संघाचे विधानसभेचे तिकीट मागितले होते. यानंतर पक्षामध्ये अमोल बालवडकर यांच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर कोणतीच जबाबदारीची पदे देण्यात आली नाहीत. या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी पक्षाच्या स्वच्छता अभियानाच्या सेलची निर्मिती करून शहरातील स्वच्छता अभियानाची जबाबदारी माझ्यावर टाकावी अशी मागणी चंद्रकांत दादांना केली.
बाणेर येथे ‘मिशन निर्मल’ स्वच्छता अभियानाचे उद्घाटन प्रसंगी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील आले होते. यावेळी अमोल बालवडकर यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना पक्षांमध्ये कोणीही स्वीकारणार नाही अशी शहर स्वच्छता अभियान सेलचे शहराचे पद तयार करून त्याची जबाबदारी माझ्यावर द्यावी अशी मागणी यावेळी अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली.
शहरातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी अमोल बालवडकर यांच्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना शहर व विधानसभा विस्ताराच्या वेळी स्थान देण्यात आले नव्हते. याबाबत असलेली खंत देखील अमोल बालवडकर यांनी यावेळी व्यक्त केली. शहरांमध्ये भाजपा पक्षाच्या वतीने स्वच्छता अभियानाचा सेल तयार करण्यात यावा या अभियानाची जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे असे अमोल बालवडकर यांनी यावेळी व्यासपीठावर सांगितले.
दरम्यान चंद्रकांतदादा पाटील यांनी या मागणीकडे फारसे लक्ष न देता अमोल बालवडकर यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच अमोल बालवडकर यांच्याप्रमाणे अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील सामाजिक जबाबदारी स्वीकारावी तसेच वॉर्डन व स्वच्छता कर्मचारी यांच्या नियुक्तीसाठी सहभाग घ्यावा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.
























