खडकवासलाः अत्यंत चुरशीच्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ सत्तारूढ महायुतीतील भाजपाचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी चौकार मारत 52322 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 163131 मते मिळाली. तिरंगी लढतीचे चित्र असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांना दोन नंबरची 110809 मते मिळाली. तर मनसेचे मयुरेश वांजळे यांना 42 हजार 897 मते मिळाली.
या निवडणुकीत 56.53 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने हे वाढीव मतदान तापकीर यांच्या पदरात पडल्याचे निकालातून दिसून आले.
मतमोजणीच्या एकूण 25 फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीत दोडके यांना 848 मतांची आघाडी होती ती दुसऱ्या फेरीत केवळ 400 मतांनी कमी झाली मात्र तिसऱ्या फेरीपासून तापकीर यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली सातव्या फेरी अखेर तापकीर यांनी ७ हजारांची आघाडी घेतली नव्या फिर अखेर 11800 मतांची आघाडी घेतली विसाव्या फेरीनंतर तापकीर यांनी 40 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली त्यानंतर अखेरपर्यंत तापकीर आघाडीवरच होते शेवटच्या पंचवीसव्या फेरीत दोडके यांना 289 मतांची आघाडी मिळाली परंतु तोपर्यंत निकाल स्पष्ट झाला होता तापकीर यांनी 52 हजार 322 मतांनी विजय मिळवला. पंचविसाव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर दोडके यांनी पुन्हा अर्ज देत व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्याकडे केली त्यानुसार पाच मशीन मधील चिठ्ठ्या मोजल्या, परंतु निकालात फरक पडला नाही.
या निवडणुकीत तापकीर यांना उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर झाली होती. त्यामुळे या मतदारसंघाबाबत चर्चा झाली होती. तिकीट वाटपामुळे उशीर झालेल्या खडकवासला मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते. मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांनी प्रचार आणि आश्वासनांचा जोर पकडल्यामुळे पारडे जड असल्याचे वातावरण निर्माण झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके यांचा जनसंपर्क आणि पक्षाची ताकद तसेच प्रचारातील जनतेच्या विकासाचे विविध मुद्दे घेऊन सामोरे गेल्याने लढतीमध्ये चुरस निर्माण झाली होती. असे असतानाही नागरिक मतदारांनी आणि लाडक्या बहिणीने वस्तुस्थितीला महत्त्व देत महायुतीच्या बाजूने दिलेला कल मतदानातून स्पष्ट झाला आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर राम कृष्ण हरी कमळ फुलले घरोघरी आणि मारला रे मारला चौकार मारला अशा घोषणा देत तापकीर यांच्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.
हा विजय माझा नसून मतदारांचा आहे. हा विजय आपल्या विकासाच्या स्वप्नांचा आपल्या समस्यांच्या समाधानाचा आणि एकत्रित काम करण्याच्या निर्धाराचा आहे. मतदारांच्या अपेक्षांची पूर्तता करणे आता माझे ध्येय आहे. सर्वांगीण विकास करताना समाविष्ट गावात पुरेशा सुविधा पुरवण्यावर माझा भर असेल. मतदार संघाला विकासाच्या नवीन उंचीवर नेऊ.
भीमराव तापकीर, विजयी उमेदवार, भाजप