महापौरांचे कडक कारवाईचे आदेश; नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

पुणे : शहरातील नदीपात्रांमध्ये बेकायदेशीररीत्या राडारोडा, बांधकामातील मलवा व कचरा टाकण्याच्या वाढत्या घटनांवर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. टिळक पुलाच्या शेजारी नदीपात्रात राडारोडा टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापौरांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारांमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो तसेच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे संबंधित विभागांनी ही बाब अत्यंत गंभीरतेने घ्यावी.

नदीपात्रात राडारोडा टाकण्याच्या घटना रोखण्यासाठी २४ तास भरारी पथक नेमण्यात आले असताना हा प्रकार कसा घडला, असा सवालही महापौरांनी उपस्थित केला. संबंधित भागातील आरोग्य निरीक्षक व बांधकाम निरीक्षक यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय राडारोडा किंवा कोणत्याही प्रकारचा कचरा नदीपात्रात टाकणाऱ्या व्यक्ती, ठेकेदार किंवा संस्थांवर तात्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी. आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
यापुढे अशा घटना टाळण्यासाठी सर्व वॉर्ड अधिकारी व संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नदीपात्रांची नियमित पाहणी करावी. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ कारवाई करावी. आवश्यक असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन सर्व्हे तसेच विशेष पथके नेमून नियंत्रण ठेवावे, असेही सांगण्यात आले.नदी स्वच्छता व संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनीही अशा प्रकारांची माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालयास तात्काळ द्यावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

See also  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा "व्हेरी गुड " श्रेणीत समावेश