उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची नवले पुल दुर्घटनेवर केंद्र–राज्य सरकारला तातडीची मागणी

पुणे : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48) वरील नवले पुल परिसरात १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे त्वरित, प्रभावी आणि शाश्वत उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यांनी नवले हॉस्पिटलला भेट देऊन  उपचारांची माहिती घेऊन प्रत्येक रूग्णाला काय पाठपुरावा लागेल याची माहिती घेतली . नवले हॉस्पिटलचे संचालक डॉ. अरविंद भोरे आणि आपत्कालीन विभाग प्रमुख डॉ. सीमा कऱ्हाडे यांनी दिलेल्या तत्पर सेवांचे त्यांनी विशेष कौतुक केले.तसेच ससुन हॅास्पीटल चे कार्यालय सुपरिटेंडट डॅा. यल्लप्पा जाधव यांच्या कडुन सतिश वाघमारे व सायनाने सय्यद या रूग्णांच्या प्रकृतीतील सुधारणेची चौकशी केली.

जखमी रुग्णांच्या पुढील उपचारांबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “रुग्णांचा डिस्चार्ज झाला असला तरी ते पुढे कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत, त्यांना कोणत्या प्रकारचे उपचार मिळाले—ही संपूर्ण माहिती एकत्र करून सरकारकडे योग्य पाठपुरावा करण्यात येईल. नवले पुलावर सतत अपघात होत आहेत, यामागील मूळ कारणे शोधून केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाय करणे अत्यावश्यक आहे. यासंबंधीचे निवेदन मी सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. वाहनचालकांसाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, तसेच रस्त्यावर सुरक्षा उपायांची अंमलबजावणी कडकपणे व्हायलाच हवी. नवले हॉस्पिटलमधील डॉ. अरविंद भोरे, डॉ.कऱ्हाडे यांनी केलेल्या उत्कृष्ट उपचार सेवांची दखल घेणे गरजेचे आहे. तसेच या भागात सुरक्षिततेसाठी निलेश गिरमे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने काम करत असून पुढील उपचार आणि सोयीसुविधा अधिक प्रभावीपणे मिळाव्यात, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.”

या अपघातात तीन वर्षांच्या बालकासह सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून २२ जण गंभीर जखमी झाले. दोन कंटेनर आणि एक कार जळून पूर्णपणे खाक झाल्याने दुर्घटनेची भीषणता जाणवते. नवले पुल परिसर गेल्या काही वर्षांपासून धोकादायक ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. अभियांत्रिकी त्रुटी, अनियंत्रित उतार, वेग नियंत्रणाचा अभाव आणि सुरक्षाव्यवस्थेतील मोठ्या उणिवांमुळे हा भाग प्रवाशांसाठी सतत धोकादायक बनला आहे.

See also  कोंढवे धावडे येथे ३० मे रोजी शासन आपल्या दारी' उपक्रम

मागील पाच वर्षांत येथे घडलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
३० नोव्हेंबर २०२० चा ट्रेलर ब्रेक-फेल,
२० नोव्हेंबर २०२२ ची ४८ वाहनांची पाइल-अप घटना,
१७ ऑक्टोबर २०२३ मधील ट्रकला लागलेली आग,
०३ मे २०२५ चा ब्रेक-फेल अपघात आणि
१३ नोव्हेंबर २०२५ चा कंटेनर-कार दुर्घटना—या घटनांत मिळून १६ मृत आणि ६०–७० जखमींची नोंद झाली आहे. या सर्व घटनांमुळे महामार्ग व्यवस्थापनातील अभियांत्रिकी चुका, अपुरी तपासणी व्यवस्था आणि वेगावरील नियंत्रणातील त्रुटी स्पष्ट दिसून येतात.

डॉ. गोऱ्हे यांनी सरकारसमोर मांडलेल्या मागण्यांमध्ये नवले पुल परिसराला ‘Critical Black Spot’ घोषित करून उताराची पुनर्रचना, रस्त्याचा अँटी-स्किड पृष्ठभाग, Arrester Bed/Runaway Truck Ramp, स्मार्ट सिग्नलिंग सिस्टीम, LED चेतावणी फलक, रंबल स्ट्रिप्स आणि जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन यांसारख्या अभियांत्रिकी सुधारणा तातडीने करण्याचा समावेश आहे.

महामार्ग सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मालवाहू वाहनांसाठी डिजिटल ब्रेक-टेस्ट प्रमाणपत्र अनिवार्य करणे, रात्री जड वाहनांचे विशेष नियंत्रण, GPS आधारित स्पीड गव्हर्नरचे पालन आणि CNG/LPG वाहनांसाठी विशेष सुरक्षा प्रोटोकॉल लागू करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, MoRTH–NHAI–IIT/COEP–ट्रॅफिक पोलीस यांच्या सहभागातून उच्चस्तरीय समिती स्थापन करून ‘Navale Corridor Safety Audit’ ३० दिवसांत प्रसिद्ध करावा आणि पाच वर्षांचा अधिकृत अपघात डेटा सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली मजबूत करण्यासाठी NH-48 वर Emergency Response Rapid Station उभारणे, २४x७ रुग्णवाहिका, फायर-युनिट आणि क्रॅश-रेस्क्यू टीम तैनात करणे, तसेच ‘गोल्डन अवर’ प्रोटोकॉलसाठी ससून, PMC, आरोग्य विभाग आणि महामार्ग नियंत्रण कक्ष यांच्यात समन्वय तयार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

पीडितांसाठी तातडीची आर्थिक मदत, जखमींच्या मोफत शस्त्रक्रिया, ट्रॉमा-रीहॅब सुविधा आणि महामार्ग सुरक्षा जनजागृती मोहीम तातडीने राबवावी, अशीही त्यांनी मागणी केली.