पुणे : पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत नसल्याने तसेच नागरिकांना औषधे बाहेरून विकत घेण्यास सांगण्याचे प्रकार घडत असल्याने अशा प्रकारांविषयी जाब विचारण्याकरता आम आदमी पार्टीने पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी निना बोराडे यांना घेराव घातला.
शहरातील सर्वच महापालिका रुग्णालयात समस्यांची वाढ झालेली असून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याचा आरोप यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला. माजी सभासद किंवा इतर प्रतिष्ठित व्यक्तींना ज्या तत्परतेने महापालिका आरोग्य सुविधा देते त्या तत्पर्तने सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे अनेक प्रकार शहरात घडत आहेत व त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे चित्र दिसून येते.
पुणे महानगरपालिकेत 2012 साली समाविष्ट झालेल्या गावात महापालिका अद्याप पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध करू शकलेली नाही, महानगरपालिकेच्या अनेक प्रसूती गृहात पूर्वनियोजित सिझेरियन होते व अचानक गरज लागल्यास गरोदर महिलेला कमला नेहरू हॉस्पिटलला पाठवले जाते व त्या ठिकाणाहून देखील पुढे त्या महिलेला ससून ला पाठवले जाते असे चित्र दिसून येते. यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.
अशाप्रकारे पुणे महानगरपालिका प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात अपयशी ठरत असल्याचे संपूर्ण शहरात चित्र आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने तात्काळ आरोग्य सुविधा सुधारल्या जाव्या अशी मागणी करण्यात आली असून मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात आम आदमी पार्टीच्या वतीने मोठे आंदोलन केले जाईल अशी चेतावणी यावेळी देण्यात आली.
– दवाखान्यांत डॉक्टर नाहीत, औषधांचा पुरवठा अपुरा, स्वच्छतेचा पूर्ण अभाव, रुग्णांशी अमानुष वागणूक, कर्मचारी वेळेवर उपस्थित नाहीत नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. माजी नगरसेवक, आमदार, खासदार आणि अधिकारी यांना ५ स्टार सुविधा, आणि नागरिकांना सुविधांच्या नावाखाली छळ – हे पूर्णतः अमान्य!
– सुदर्शन जगदाळे शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी
– “पुणे महानगरपालिकेच्या आरोग्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत विचारले असता आरोग्य प्रमुखांनी केवळ पोस्टमन सारखे “पत्र दिले आहे” अशी उत्तरे दिली. आरोग्य विभागाचे नाव बदलून पोस्ट विभाग असे नामकरण करण्यात यावे. हतबल पोस्टमन आरोग्य प्रमुखांनी राजीनामा द्यावा. आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभाराची गंभीर दखल आयुक्तांनी घ्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.”- डॉ अभिजित मोरे, राज्य सचिव
आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे :
1) पुणे महानगरपालिकेच्या शहरातील 20 प्रसूतीगृहात भूलतज्ञ उपलब्ध नसल्याने तातडीचे सिझेरियन होत नाही. या सर्व प्रकाराचा ताण कमला नेहरू हॉस्पिटल वर पडत असून तो कमी करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात असणाऱ्या प्रसूती गृहात भूलतज्ञ तसेच लहान मुलांचे डॉक्टर यांची तातडीने नियुक्ती करावी व कमला नेहरू हॉस्पिटल वरील ताण कमी करावा.
2) कमला नेहरू हॉस्पिटल कडून मोठ्या प्रमाणात गरोदर महिलांना इमर्जन्सी प्रसूतीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. त्यामुळे असे ससून कडे पाठवण्याचे प्रकार तात्काळ थांबवले जावेत. व इमर्जन्सी प्रसूतीच्या योग्य त्या सुविधा महापालिकेच्या प्रसूतीगृहातच निर्माण केल्या जाव्यात.
3) कमला नेहरू हॉस्पिटल मधील एक लिफ्ट मागील काही कालावधीपासून बंद असल्याने त्याचा त्रास रुग्णांना होत असून सदर लिफ्ट ची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
4) कमला नेहरू हॉस्पिटल परिसरात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने व सध्या असलेल्या महिला सुरक्षारक्षकांची संख्या मर्यादित असल्याने नवीन महिला सुरक्षारक्षकांची तातडीने नेमणूक करण्यात यावी.
5) बोपोडी येथील संजय गांधी प्रसूचीगृहाचे बांधकाम होऊन देखील मागील तीन वर्षांपासून ते सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास पाहता ते तात्काळ सुरू करावे.
6) पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 2012 साली समाविष्ट झालेल्या गावात 12-13 वर्षानंतर देखील पुरेशा आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी आरोग्यवस्था निर्माण करून नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत.
7) पीपीपी तत्त्वावर चालणाऱ्या हॉस्पिटल्स बाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत असेल पुणे महानगरपालिकेने केलेल्या करारानुसार जर सदर हॉस्पिटल सेवा देत नसेल तर सदर हॉस्पिटल वर तात्काळ कारवाई करावी.
8) ज्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा एकाच ठिकाणी तीन वर्षापेक्षा जास्त काळ झाल्या असतील त्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात.
9) रुग्णांना त्यांच्या उपचाराचा केस पेपर दिला जावा, जेने करून एखाद्या रुग्णाला खाजगी उपचार घेण्याची गरज पडल्यास तो घेत असलेल्या ट्रीटमेंट ची माहिती खाजगी दवाखान्यात देता येऊ शकेल.
10) सरकारी दवाखान्यात अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे मलम कागदावर दिले जातात, अशा प्रकारामुळे औषधाची गुणवत्ता कमी होत असून मलम किंवा खोकल्याचे औषध ज्यावर त्याची एक्सपायरी डेट असेल अशा बंद बाटलीत दिले जावे.
11) डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती वेळेवर नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी.
12) सोनवणे प्रसूती गृहातील अवैध पार्किंग तसेच दारू पिण्याचे प्रकार वाढत असून यावर तात्काळ कारवाई केली जावी.
13) डायलिसिस साठी पूर्वी 1350 रुपये खर्च येत असताना व या चटणीत इतर खाजगी दवाखाने डायलिसिस प्रक्रिया करत असताना महापालिकेने 1900 रुपयाचा दर कशाच्या आधारे ठरवला याची चौकशी व्हावी.
14) पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे रुग्णांची सौजन्याचे वागणे नसते, रुग्णांना अपमानित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.
यावेळी आम आदमी पार्टी च्या वतीने कुमार घोंगडे, अनिकेत शिंदे, प्रदीप उदागे, शेखर ढगे, मनोज शेट्टी, इब्राहिम सय्यद, नौशाद अन्सारी, निखिल खंदारे, आरती करंजावणे, मनोज ओझा, उमेश बागडे, किरण कांबळे, विकास चव्हाण, प्रतीक बनसोडे, सुनील भोसले, रवी कलप, अजिंक्य जगदाळे, प्रमोद नाडे, सिद्धार्थ तूपारे, शंकर थोरात, अॅड. दत्तात्रय भांगे, अमोल मोरे, सुभाष कारंडे, अक्षय शिंदे व अॅड.अमोल काळे यांनी पुणे महानगरपालिका वैद्यकीय प्रमुख यांना निवेदन दिले.
























