पुणे – महानगरपालिकेच्या दळवी रुग्णालयात नवजात बालकांसाठी एनआयसीयू आणि आयसीयू यंत्रणा उभारण्याबाबत तसेच डॉ. होमी भाभा रुग्णालयाचे काम वेगाने सुरु करण्याबाबत आज (गुरुवारी) महापालिकेचे आरोग्य प्रमुख श्री भगवान पवार यांच्या बरोबर सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये सध्या महिला प्रसूतीगृहासाठी पुणे महानगरपालिकेचे दळवी प्रसूतिगृह उपलब्ध आहे. या प्रसुतीगृहाचा लाभ मुळारोड, पीएमसी कॉलनी, पाटील इस्टेट वसाहत, नरवीर तानाजी वाडी, भैय्यावाडी, छत्रपती शिवाजीनगर, गोखलेनगर या ठिकाणच्या गर्भवती महिला भगिनींना होतो.
दळवी हॉस्पिटलमध्ये मोठया प्रमाणात जागा उपलब्ध आहे. याठिकाणी नवजात बालकांसाठी एनआयसीयू आणि आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे गर्भवती महिला भगिनींची खूप गैरसोय होते. येत्या काळात या हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांसाठी माफक दरात एनआयसीयू आणि आयसीयू करण्यासाठी लवकरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचेकडे मागणी करणार आहे.
याबरोबरच हॉस्पिटलमध्ये उपकरणे, सेवकवर्ग, तज्ञ्ज डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वर्ग ४ कर्मचारी यांची देखील संख्या येणाऱ्या १५ दिवसांत वाढवणार आहे. या रुग्णालयात माफक दरात डायलिसीस सुरु करणार असून, याचा लाभ प्रामुख्याने वस्ती विभागात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना होईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
तसेच डॉ होमी भाभा रुग्णालयाचे काम वेगाने सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचेबरोबर सविस्तर बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आढावा बैठकीला सुभाषराव जेऊर, बिरू नाना खोमणे, बाळा राऊत, श्याम आप्पा सातपुते, लक्ष्मण लोखंडे, शांताराम धोत्रे, अतिरिक्त आयुक्त बिनवडे, आरोग्य प्रमुख भगवान पवार आदि उपस्थित होते.