बिल्डरच्या सोयीसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी का? आप चा सवाल ; ३५ कोटीचा पूल आणि आता तब्बल २० कोटीचे सुशोभीकरण कोणासाठी?

औंध : मागील वर्षी औंध रोड आंबेडकर चौक बोपोडी ते जुन्या सांगवीला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण झाले. आता त्याच पुलावर तब्बल वीस कोटीचे सुशोभीकरण केले जात असून हा खर्च केवळ खाजगी बिल्डरसाठी केला जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

२०२१ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने याविषयीचा प्रस्ताव तयार करून ३५ कोटी चा हा पूल बांधला. यामध्ये पुणे महानगरपालिकेने निम्मा खर्च केला आहे. मागील वर्षे ऑक्टोबर २०२४ मध्ये अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. हा पूल बांधून झाल्यावर लगेचच त्याच्या वापराविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले. या पुलावरून अत्यल्प वाहतूक होत होती तसेच खडकी कडून सांगवीकडे जाण्यासाठी मोठा युटर्न घ्यावा लागत होता. तसेच हा पुलाचा आरंभ डॉ आंबेडकर चौकात होत नसल्यामुळे बोपोडीतून अनेक वाहने उलट दिशेने या पुलावर येत होती. हा पुल रहदारीसाठी फारसा वापरला जात नसल्यामुळे त्यावर रेसिंग, दारूपान असे गैरप्रकार होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करीत होते.आता हा पूल तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आला असून त्यावर २० कोटी रुपयाचा सुशोभीकरणासाठी खर्च केला जात आहे.

या पुलाच्या जुन्या सांगवीकडील बाजूस सर्व रस्ते हे छोट्या गल्ल्यांचे आहेत. तिथून फारशी वाहतूक होत नाही. तरीसुद्धा हा पूल १८ मीटर रुंदीचा बांधण्यात आला. या पुलाच्या जुन्या सांगवी कडील भागात समोर दोन मोठे हरित अच्छादन असलेले अंदाजे ८ हेक्टर चे खाजगी प्लॉट असून ते बिल्डर विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या भागामध्ये इतर रस्ते छोटे असताना हाच पूल मोठा करण्यामागचे कारण मुळात या प्लॉट्स पर्यंत पोहोचण्यासाठी चा रस्ता तयार करणे हा होता. आता तिथे काही माजी नगरसेवकांचा यामध्ये रस असून अजितदादा पवार यांनी यासाठीच या पूलाच्या सुशोभीकरणाचाही आग्रह धरला असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

See also  बाणेर च्या श्रीराम समर्थ पतसंस्थेचा राज्यस्तरीय "दीपस्तंभ पुरस्काराने" सन्मान

“हा पूल निळी पूररेषा ( ब्ल्यू फ्लड लाइन) च्या आतमध्ये असल्याने पूर आल्यावर हा पूल पाण्याखाली जाणार आहे असे असताना त्याचे सुशोभीकरण का? ३५ कोटीच्या पुलावरती २० कोटीचे सुशोभीकरण हा वायफळ खर्च केवळ बिल्डरसाठी असून जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे.” असे प्रश्न आप ने विचारले असून या सुशोभीकरणाऐवजी त्याला लागून असलेला भाऊ पाटील रोड व खडकी रोड या भागामध्ये आणि जुन्या सांगवी भागांमध्ये रस्ते सुधारणा, वाहतूक नियंत्रण, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक कोंडी, पावसाळी लाइन, पुरासाठी संरक्षक भिंत आदी समस्या सोडवण्यासाठी हा खर्च होणे जास्त संयुक्तिक ठरले असते असे आप नेते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.