औंध–बोपोडीतील भाजप–आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ; माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांचे मतदारांना जाहीर आवाहन

Lऔंध : पुणे महानगरपालिका प्रभागातील औंध–बोपोडी परिसरात भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी मतदारांना जाहीर आवाहन केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप–आरपीआय युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारतीय जनता पक्षाकडून भक्ती अजित गायकवाड, सपना आनंद छाजेड, सनी निम्हण आणि परशुराम वाडेकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हे चारही उमेदवार औंध–बोपोडी परिसरातीलच असून सुशिक्षित, कार्यकुशल आणि सामाजिक कार्याची जाण असलेले म्हणून त्यांची ओळख आहे, असे दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले. “मी सलग २५ वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व केले असून सलग तीन वर्षे पुणे शहराचे महापौरपद भूषवले आहे. त्यामुळे परिसराच्या समस्या आणि गरजा मला चांगल्या प्रकारे माहित आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
मतदारांना संबोधित करताना गायकवाड म्हणाले की, “या चारही उमेदवारांना आपले प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देण्यासाठी या निवडणुकीत मतदान करणे आवश्यक आहे. सक्षम आणि प्रामाणिक प्रतिनिधीच परिसराचा खरा विकास करू शकतात.”

मागील पंचवार्षिक काळात स्थानिक लोकप्रतिनिधींनी अपेक्षित व नियोजनबद्ध विकास केला नाही, त्यामुळे औंध परिसराचा विकास रखडला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. चुकीच्या कामांमुळे नागरिकांमध्ये संताप असून त्यामुळेच त्या लोकप्रतिनिधींना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही, असेही दत्तात्रय गायकवाड यांनी स्पष्ट केले.

ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि औंध–बोपोडी परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे आणि विकासाभिमुख उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. “मी विश्वास देतो की भाजप–आरपीआय युतीचे उमेदवार निवडून आल्यास ते प्रामाणिकपणे काम करून परिसराचा विकास करतील. त्यामुळे मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे,” असे दत्तात्रय गायकवाड यांनी शेवटी सांगितले.

See also  माझ्या आईने भाजपा पक्षासाठी कसब्यात केलेल्या कार्याचा आदर व्हायला हवा - कुणाला टिळक