बाणेर मध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा

पुणे : पुण्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यातील बाणेर परिसरातील एका संस्थेने केला आहे. हा संस्थाचालक फरार झाल्याने अनेक गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. अनेक बड्या नेत्यांनी, गँगस्टरनी याच्याकडे गुंतवणूक केलेली असल्याचे समजते. पण खरा फटका छोट्या गुंतवणूकदारांना बसणार आहे. हा संस्थाचालक फरार झाल्याचे समजताच गुंतवणूकदारांनी बाणेर रस्त्यावरील कार्यालयात मोठी गर्दी केली होती.

बार्शी येथील विशाल फटे याने असाच प्रकार करून शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घातला होता. तसाच प्रकार बाणेर येथे घडला आहे.
या शेअर मार्केट दलालाच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर महिना दहा टक्के या दराने परतावा देण्याच आश्वासन गुंतवणूकदारांना दिले होते. त्यासाठी किमान गुंतवणूक एक लाख रुपयांची करणे अपेक्षित होते. या परताव्याचा दर काही दिवसांपूर्वी पाच टक्के करण्यात आला आणि वीस महिन्यात गुंतवणूक दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मूळ रकमेचा धनादेशही कंपनीच्या वतीने सुरक्षितता म्हणून दिला जाईल अशी ग्वाही गुंतवणूकदारांना देण्यात आली होती.
दर महिन्याला हा परतावा हमखास मिळेल असे सांगण्यात आले होते. त्या दृष्टीने गेले काही दिवस काही गुंतवणूकदारांना सुरुवातीला दहा टक्क्याने आणि नंतर पाच टक्क्यांनी प्रति महिना परतावा मिळाला एवढे हमखास उत्पन्न मिळत असल्याने अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. मात्र कार्यालय बंद असल्याचे पाहून गुंतवणूकदारांना धडकी भरली आणि त्यानंतर ही वार्ता सर्वत्र पोहोचली. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणी धाव घेतलेली नाही.

See also  लोणी काळभोर येथे स्टेज कोसळून एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी