सचिन साठे सोशल फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांचा भव्य गुणगौरव सोहळा संपन्न : उपक्रमाचे २१ वे वर्ष.

पिंपळे निलख (प्रतिनिधी) :  सचिन साठे सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित इयत्ता १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ – २०२५ हा सोहळा यावर्षीच्या वैभवशाली २१व्या वर्षात दिमाखदार पद्धतीने पार पडला.

या भव्य सोहळ्याला माननीय आमदार शंकरभाऊ जगताप, माजी आमदार अश्विनीताई जगताप, तसेच शहराध्यक्ष भाजप (पिंपरी चिंचवड) श्री. शत्रुघ्न (बाप्पू) काटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विशेष आकर्षण म्हणून समाजप्रबोधनकार प्रा. गणेश शिंदे सर यांचे प्रेरणादायी व्याख्यान आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे यांची उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणारी ठरली.

स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृती पुरस्कार (इ.१२ वी प्रथम क्रमांक – ₹१५,५५५ रोख व सन्मानचिन्ह) वरद मनीष गुप्ता याला प्रदान करण्यात आला तर , स्व. सुरज काळूराम नांदगुडे स्मृती पुरस्कार (इ.१० वी प्रथम क्रमांक – ₹११,१११ रोख व सन्मानचिन्ह) अवनी सचिन गुंड हिला प्रदान करण्यात आला. तसेच , ८५% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच, सन्मानचिन्ह आणि स्कूल बॅग प्रदान करण्यात आली.
तर , इ.१० वी आणि १२ वी च्या सर्वच ३५% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व स्कूल बॅग देऊन गौरव करण्यात आला.

प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान यामध्ये , श्री. विष्णुपंत अर्जुन इंगवले, डॉ. राजेंद्र सयाजी कोकणे, श्री. बाळासाहेब जगताप, श्री. अनंतराव कस्पटे, श्री. दत्तात्रय किसन इंगवले, श्री. बाळासाहेब करंजुले, श्री. सुरेश काशिनाथ चव्हाण, डॉ. संदीप लूनावत, डॉ. संदीप पाटील, श्री. माणिक कुटे, श्री. सचिन बडगे, श्री. संजय काळूराम दळवी, श्री. सोमनाथ बाळासाहेब इंगवले, श्री. गणेश पंडितराव साठे, श्री. अशोक बनसोडे, मैत्री ग्रुप (पिंपळे निलख), कु. शौर्य विशाल इंगवले, डॉ. विजय पाटील (गायन ग्रुप, विशाल नगर) आणि कु. आर्या गवळी. यांना शाल , श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

See also  भाजपा ओबीसी सेल पुणे शहर उपाध्यक्षपदी राजेंद्र पाषाणकर यांची नियुक्ती

आमदार शंकरभाऊ जगताप म्हणाले, “गेल्या २१ वर्षांपासून विद्यार्थ्यांचा व समाजातील मान्यवरांचा सन्मान करून प्रेरणादायी उपक्रम राबवणे ही अभिमानास्पद बाब आहे. पंतप्रधान मोदींजींचे २०४७ साली भारताला विकसित भारत घडविण्याचे व्हिजन आहे. आजचे पुरस्कार्थी विद्यार्थीच हे उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. ”

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे म्हणाले, “हा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. विद्यार्थ्यांनी चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केलेले आहे त्यासाठी काटेकोर मेहनत आणि वेळेचे उत्कृष्ट नियोजन ही सर्व विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे.”

अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान हा त्यांच्यासाठी मोठी प्रेरणा असून, मला या सोहळ्याचा भाग होण्याचा आनंद आहे.”

या कार्यक्रमाचे आयोजन सचिन मुरलीधर साठे व सचिन साठे सोशल फाऊंडेशन यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.